नांदेड| स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठामध्ये दि. ८ मार्च रोजी जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून विद्यापीठातील सर्व शिक्षक व शिक्षकेत्तर महिला कर्मचाऱ्यांशी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. उद्धव भोसले यांनी संवाद साधला. उपस्थित सर्व महिलांना गुलाब पुष्प देऊन त्यांचा सन्मान केला.
यावेळी व्यासपीठावर विद्यापीठाचे कुलसचिव डॉ. सर्जेराव शिंदे, मानव्य विद्याशाखेचे अधिष्ठाता डॉ. अजय टेंगसे, ज्येष्ठ कवी डॉ. केशव देशमुख, व्यवस्थापन परिषद सदस्या डॉ. वैयजंता पाटील, राष्ट्रीय सेवा योजना विभागाचे संचालक डॉ. शिवराज बोकडे यांची उपस्थिती होती.
घराचे घरपण कायम ठेवून कार्यालयीन काम नीट-नेटकेपणा पार पडणारी ही महिला शक्ती विद्यापीठाच्या जडण-घडणामध्ये महत्त्वाची भूमिका पार पाडत आहे. कार्यालयीन कामकाजामध्ये महिला कर्मचाऱ्यांच्या टिपण्या उत्कृष्ट दर्जाच्या असतात. त्यामुळे यानिमित्ताने मी सर्व महिलांना ‘महिला दिनानिमित्त’ शुभेच्छा देतो आणि त्यांनी विद्यापीठासाठी चांगल्यात-चांगले काम करून विद्यापीठाला एका उच्च स्थानावर पोहोचण्यासाठी मेहनत घ्यावी, असे आवाहनही त्यांनी यावेळी केले.
कविवर्य डॉ. केशव देशमुख यांची ‘धाडसाची सार’ ही कविता डॉ. वैयजंता पाटील यांनी वाचून दाखवली तर महामाया कदम यांनी लिहिलेली ‘आई’ ही कविता उज्वला हंबर्डे यांनी सादर केली. कार्यक्रमाचे आयोजन केल्याबद्दल महिलांची प्रतिनिधी म्हणून डॉ. सरिता यन्नावार यांनी कुलगुरू महोदय यांचे आभार मानले.या कार्यक्रमास अधिसभा सदस्य उद्धव हंबर्डे जनसंपर्क अधिकारी डॉ. अशोक कदम आणि विद्यापीठातील सर्व शिक्षक व शिक्षकेत्तर महिला कर्मचाऱ्यांची उपस्थिती होती. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ. शिवराज बोकडे यांनी केले तर आभार प्रदर्शन कुलसचिव डॉ. सर्जेराव शिंदे यांनी केले.