योग्य व कसून चौकशी केल्यास अनेक बडे मासे अडकणार : कॉ.गंगाधर गायकवाड
नांदेड | मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे शहर सचिव तथा " द हिंदू " इंग्रजी वृत पत्रासाठी चांगला प्रेस मिळविलेले कार्यकर्ते कॉम्रेड गंगाधर गायकवाड यांनी अभ्यासपूर्ण व सखोल शोधमोहिमेतून दि.१० नोव्हेंबर २०२१ रोजी जिल्हाधिकारी, महसूल मंत्री ना.बाळासाहेब थोरात,मुख्यमंत्री,राज्याचे मुख्य सचिव,महानिरीक्षक मुद्रांक नियंत्रक पुणे, पोलिस अधिक्षक नांदेड यांच्यासह माकपचे आमदार कॉ.विनोद निकोले यांच्याकडे लेखी तक्रार अर्ज देऊन दस्त नोंदणी,मुद्रांक व जमीन घोटाळ्यातील संबंधित दोषीवर कठोर कारवाई करण्याची मागणी केली होती.
जिल्हाधिकारी नांदेड आणि राज्यातील वरिष्ठ सनदी अधिकाऱ्यांनी तक्रारीची दखल घेत चार महिन्या नंतर प्रत्यक्षात भ्रष्टाचार करून उखळ पांढरे करणाऱ्यांवर कारवाई करण्यासाठी उप जिल्हाधिकारी पद असणाऱ्या अधिकाऱ्यांवर जबाबदारी देत जिल्हाभर समित्या गठित केल्या आहेत. मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाच्या वतीने करण्यात आलेल्या तक्रारीत नांदेड शहरात व जिल्ह्यात बोगस दस्त नोंदणी करणारी व मोकळे भूखंड हडप करणारी टोळी सक्रिय असल्याचे नमूद केलेले आहे.
तसेच अकृषीक परवानग्या न घेता बनावट कागदपत्रे तयार करून बोगस दस्त नोंदणी करणे ,तुकडेबंदी व तुकडेपाड कायद्याचे उल्लंघन करणे,मोकळ्या भूखंडावर ताबा मिळविणे असे बेकायदेशीर कृत्य करून भ्रष्टाचार करून स्वतःचे उखळ पांढरे करीत आहेत. आणि या भूमाफियाच्या टोळीमध्ये निबंधक,दुय्यम निबंधक,सह निबंधक,उपरोक्त कार्यालयीन कर्मचारी,ग्रामसेवक,तलाठी व काही महसूल मधील अधिकारी कर्मचारी असू शकतात व वरिष्ठ समिती मार्फत चौकशी केल्यास येथील भ्रष्टाचार व घोटाळा सिद्ध होईल असे स्पष्टपणे आपल्या निवेदनात नमूद केले आहे.निवेदनावर कॉ.गंगाधर गायकवाड यांची स्वाक्षरी असून योग्य कारवाई केली नाहीतर जिल्हाधिकारी कार्यालय नांदेड व दुय्यम निबंधक कार्यालया समोर आंदोलन करण्याचा इशाराही दिला होता.
कारवाई होत नसल्याचे लक्षात येताच मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाच्या वतीने दि.२० डिसेंबर ते १० जानेवारी २०२२ असे एकवीस दिवस अखंड धरणे आंदोलन जिल्हाधिकारी कार्यालय नांदेड समोर केले आहे.या आंदोलनात इतरही काही जीवन मरणाच्या मागण्या करण्यात आल्या होत्या परंतु दि.१० जानेवारी २०२२ रोजी नांदेड पोलीसांनी ते आंदोलन चिरडून काढले आहे.तशी तक्रार माकपच्या वतीने महाराष्ट्राचे राज्यपालांकडे केली आहे.
मागील तीन वर्षापासून झालेल्या दस्त नोंदीची तपासणी करावी ही मूळ मागणी डावलून केवळ दोन महिन्यात झालेल्या दस्त नोंदीची कागदपत्रे पडताळून व तपासून कारवाई करण्याचे आदेश जिल्हाधिकारी डॉ.विपीन ईटनकर यांनी दिले आहेत. तेव्हा कॉ.गंगाधर गायकवाड यांनी जोडपत्र देऊन मूळ मागणी प्रमाणे मागील तीन वर्षात झालेल्या दस्त नोंदणीची तपासणी करावी अशी मागणी केली आहे.महापालिकेलाही कागदपत्रे तपासून अहवाल पाठविण्याच्या सूचना जिल्हाधिकारी यांच्या मार्फत करण्यात आल्या आहेत. परंतु महापालिकेचे अनेक मोक्याच्या ठिकाणावरील भूखंड भूमाफियांनी बनावट दस्त तयार करून बळकावले आहेत.
म्हणून शहरातील कागदपत्रे तपासणी व प्रत्यक्ष पाहणीसाठी औरंगाबाद विभागीय समितीची निवड करावी व दोषींवर कठोर कारवाई करण्याची मागणी मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाच्या वतीने करण्यात आली आहे. संपूर्ण महाराष्ट्रात गाजत असलेल्या नांदेड जिल्ह्यातील बोगस दस्त नोंदणी,मुद्रांक व जमीन महाघोटाळ्याची व्याप्ती मोठी आणि धक्कादायक असून योग्य व कसून चौकशी केल्यास अनेक बडे मासे ह्या मध्ये अडकतील असा विश्वास कॉ.गंगाधर गायकवाड यांनी व्यक्त केला आहे.