नांदेड जिल्हा परिषदेने अनुसूचित जाती-जमातीच्या योजना तळागाळापर्यंत प्रभावीपणे राबविल्या -NNL

जिल्हा परिषदेच्या प्रशासक तथा सीईओ वर्षा ठाकूर-घुगे यांचे राज्य अनुसूचित जाती- जमाती आयोगाचे अध्यक्ष ज.मो. अभ्यंकर यांच्याकडून कौतुक


नांदेड|
नांदेड जिल्ह्यात अनुसूचित जाती व जमातीसाठी राबविण्यात येणाऱ्या योजना तळागाळापर्यंत पोहोचल्या असून सामान्य लाभार्थ्यांपर्यंत योजनांचा लाभ मिळावा यासाठी प्रशासनाने भरीव प्रयत्न केल्याचे मत राज्य अनुसूचित जाती जमाती आयोगाचे अध्यक्ष ज. मो. अभ्यंकर यांनी व्यक्त केले. या कार्याबद्दल त्यांनी जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी वर्षा ठाकूर- घुगे यांची प्रशंसा केली.

महाराष्ट्र राज्य अनुसूचित जाती जमाती आयोगाचे पथक आज नांदेड जिल्हा दौऱ्यावर आले आहे. जिल्हा परिषदेतील यशवंतराव चव्हाण सभागृहात जिल्ह्यातील विविध योजनांचा त्यांनी आढावा घेतला. जिल्हा परिषदेने केलेल्या कामकाजाची माहिती जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी वर्षा ठाकूर-घुगे यांनी दिली. यावेळी विविध उपक्रमांचे सादरीकरण करण्यात आले.

सुनो प्रकल्पाअंतर्गत विद्यार्थ्यांच्या तपासण्या व त्यांना साहित्य वितरण करण्यासाठी सोय करणे याअंतर्गत 11 लाख 81 हजार 722 बालकांची तपासणी झाली आहे. एकूण 67 अद्यावत रुग्णवाहिका जिल्ह्यात घेण्यात आल्या आहेत. कायाकल्प प्रकल्पात जिल्ह्याच्या विशेष प्रयत्नातून 20 प्राथमिक आरोग्य केंद्रांना राज्य शासनाचा कायकल्प पुरस्कार मिळाला आहे. देशपातळीवर तपासणीसाठी 5 प्राथमिक आरोग्य केंद्राची राज्यशासनाकडून शिफारस झाली आहे. प्राथमिक आरोग्य केंद्रांना सौर ऊर्जा प्रणाली द्वारा विद्युत पुरवठा, घनदाट वृक्षांची लागवड, महिला आरोग्य कर्मचाऱ्यांची तपासणी, मिशन आपुलकी अंतर्गत शाळांना चार कोटी रुपयांचा निधी, ग्रामस्तरावर लोकसहभागातून उपलब्ध करण्यात आलेला आहे. नववी व दहावी व बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी विविध स्पर्धा परीक्षांची शालेय जीवनात माहिती व्हावी यासाठी 16 तालुक्यामध्ये विद्यार्थ्यांच्या कार्यशाळा घेण्यात आल्या आहेत.

माझी मुलगी माझा अभिमान या योजनेअंतर्गत सर्व घरांवर मुलीच्या नावाच्या पाट्या लावण्यात आल्या आहेत. अंगणवाडी केंद्रांचे रूपांतर स्मार्ट अंगणवाडी मध्ये करण्यात येत आहे. पशुसंवर्धन विभागा अंतर्गत 540 ठिकाणी खोडे स्थापित केले आहेत. 178 पशुवैद्यकीय संस्थांपैकी 36 संस्थेमध्ये जनावरांना पिण्याच्या पाण्याचे पाणवठे उपलब्ध केले आहेत. सुंदर माझे कार्यालय सुंदर माझ्या शाळा, मॉडेल पशुवैद्यकीय दवाखाने, जागतिक महिला दिनाच्या औचित्याने संपूर्ण सप्ताहभर विविध उपक्रम घेतले. सर्व महिला कर्मचाऱ्यांची तपासणी, व्याख्याने, चर्चा सत्र आदी विविध कार्यक्रम घेतले आहेत. अशी माहिती जिल्हा परिषदेच्या प्रशासक तथा मुख्य कार्यकारी अधिकारी वर्षा ठाकूर -घुगे यांनी दिली.

जिल्हा परिषदेच्या सर्व विभागांमार्फत अनुसूचित जाती जमातीच्या लाभार्थ्यांसाठी राबविण्यात येणाऱ्या योजना या दुर्बल घटकांना सक्षम करणाऱ्या योजना आहेत. त्यामुळे त्या अत्यंत प्रभावीपणे राबविणे आणि लाभार्थ्यांपर्यंत योजना पोचणे आवश्‍यक असते. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी सामाजिक समतेच्या प्रस्थापनेसाठी आयुष्यभर प्रयत्न केले. आंतरजातीय विवाह हे त्याच समता प्रस्थापनेचे प्रतीक असल्याचेही ज.मो. अभ्यंकर यांनी सांगितले. यावेळी समितीचे सदस्य आर.डी .शिंदे (सेवा) के.आर. मेढे (सामाजिक व आर्थिक) जनसंपर्क अधिकारी रमेश शिंदे यांच्यासह नांदेडचे जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटणकर, नांदेड जिल्हा परिषदेच्या प्रशासक तथा मुख्य कार्यकारी अधिकारी वर्षा ठाकूर घुगे, सहाय्यक जिल्‍हाधिकारी डॉ. किर्तीराज पुजार, पोलीस अधिकक्षक प्रमोद शेवाळे, महापालिकेचे आयुक्‍त डॉ. सुनिल लहाने, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. संजय तुबाकले, समाज कल्याणचे सहाय्यक आयुक्त तेजस माळवदकर, जिल्हा परिषदेचे उप मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ.सुधीर ठोंबरे, यांच्‍यासह सर्व विविध विभागातील प्रमुखांची उपस्थिती होती.

याप्रसंगी कृषी विभाग, समाज कल्याण व पशुसंवर्धन विभातंर्गत दुर्गम व ग्रामीण भागातील लाभार्थ्यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी आंतरजातीय विवाह केलेल्या जोडप्यांच्या चेहर्‍यावरील आनंद, दुर्गम भागातील लाभार्थ्यांच्या चेहऱ्यावरचे समाधान बघून खूप आनंद झाला. खरं तर आयोगासमोर कागदावर अहवाल ठेवण्यात येतो परंतु जिल्हा परिषद नांदेडने लाभार्थ्यांना समोर केल्यामुळे त्यांच्यापर्यंत पोहोचण्याचा आनंद मिळाला. या भावना समितीने व्यक्त केल्या. जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर व मुख्य कार्यकारी अधिकारी ठाकूर-घुगे यांनी मेरी बेटी मेरा अभिमान अंतर्गत मुलींच्या नावाचा पाट्यांच्या उपक्रमाचे त्यांनी भरभरून कौतुक केले. स्त्री आत्मसन्मानाच्‍या दृष्टीने हे महत्त्वाचे पाऊल आहे, असे समितीने नमूद केले.

Post a Comment

please do not enter any spam link in the comment box

Previous Post Next Post
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी