राष्ट्रीय बाल स्वास्थ्य व महात्मा जोतिबा फुले जनआरोग्य योजना
कार्यक्रमाअंतर्गत मोफत होणार या शस्त्रक्रिया
जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. भोसीकर यांचे समुपदेशन
नांदेड, अनिल मादसवार| ग्रामीण व शहरी भागात काही मुले जन्मत:च हृदयाशी संबंधित काही विकार घेऊन त्याला सोबती करतात. यात प्रामुख्याने हृदयाला छिद्र असणे, वॉलसंबंधित अडचण असणे आदी बाबी प्रामुख्याने आढळतात. अशा मुलांना लहानपणीच वेळीच निदान करून उपचार केले तर त्यांना कायमचे या आजारापासून मुक्त होता येते. यासाठी शासनाने राष्ट्रीय बालस्वास्थ कार्यक्रम अंतर्गत विशेष उपक्रम हाती घेतला आहे.
या उपक्रमाला शासकीय योजनेच्या पलीकडे जाऊन नांदेड जिल्हा प्रशासन, जिल्हा परिषद आणि आरोग्य विभागाने हा उपक्रम सामाजिक कृतज्ञतेच्या भावनेतून जपला. पालकमंत्री अशोक चव्हाण यांनी यासाठी वेळोवेळी प्रोत्साहन देऊन नांदेड जिल्ह्यातील ग्रामीण भागावरही अधिक भर देण्याचे निर्देश जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांना दिले. या सामुहिक प्रयत्नातून संपूर्ण जिल्ह्यात व्यापक तपासणी मोहिम हाती घेतली गेली. यात सुमारे 30 बालकांना शस्त्रक्रिया करण्याची अत्यावश्यकता लक्षात घेऊन त्यांना धीर देऊन आज वर्धा आणि नागपूरकडे रवाना केले.
एवढी व्यापक मोहीम नांदेड जिल्ह्याचा विस्तार घेऊन राबविणे व यातून ही गरजवंत मुले निवडून तातडीने त्यांना शस्त्रक्रियेसाठी व पुढील उपचारासाठी पाठविणे अत्यंत गरजेचे होते. कोविड-19 मध्ये गत दोन वर्षाच्या गेलेला कालावधी लक्षात घेता आम्ही प्राधान्याने मुलांच्या आरोग्याकडे विशेष लक्ष देऊन यासाठी नियोजनबद्ध वेळेत सामुहिक प्रयत्न केल्यामुळे आता ही मुले सदृढ हृदय घेऊन परतील अशी भावूक प्रतिक्रिया जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी वर्षा ठाकूर-घुगे यांनी व्यक्त केली. श्री गुरु गोबिंदसिंघजी स्मारक शासकीय जिल्हा रुग्णालयाच्या नवीन इमारतीत आयोजित करण्यात आलेल्या या भावूक समारंभास जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. निळकंठ भोसीकर, या योजनेचे समन्वयक तथा निवासी वैद्यकीय अधिकारी डॉ. अविनाश वाघमारे, बालरोग तज्ज्ञ डॉ. बजाज, जिल्हा परिषदेचे अतिरिक्त जिल्हा आरोग्य अधिकारी शिवशक्ती पवार, जिल्हा शिक्षण अधिकारी प्रशांत दिग्रसकर, जिल्हा कार्यक्रम समन्वयक अनिल कांबळे, डॉ. अनिल रुईकर आदी मान्यवर उपस्थित होते.
काही आजाराबाबत बाळाच्या आईनेही अधिक दक्ष असले पाहिजे. कोणताही आजार अथवा बाळाला न ऐकता येणे, दृष्टि कमी असणे हे आईच्या चटकन लक्षात येते. यावर तात्काळ उपचार केल्यास हे दोष बरे होऊ शकतात, त्यावर यशस्वी उपचार होऊ शकतात. महिलांनी व कुटुंबातील सदस्यांनी मुलांच्या आरोग्याबद्दल अधिक दक्षता घेऊन उपचारासाठी शासकीय रुग्णालयाकडे आले पाहिजे, असेही वर्षा ठाकूर-घुगे यांनी सांगितले. कोरोना काळात सर्वांपर्यंत पोहचणे आव्हानात्मक होते पण त्यावर मात करून ही मुले निवडणे आणि त्यांच्या पालकांना उपचारासाठी तयार करणे हे काम सोपे नव्हते. आरोग्य विभागाच्या आमच्या टिमने यासाठी दिलेले योगदान मोलाचे असल्याचे सांगून त्यांनी वैद्यकीय टिमचा गौरव केला.
त्वरीत उपचाराने आजार बरे होतात - डॉ. निळकंठ भोसीकर - सदरील मुले उपचारासाठी रवाना करण्यापूर्वी जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. निळकंठ भोसीकर यांनी स्वत: तपासणी करून बालक व त्यांच्या पालकांना उपचाराबाबत माहिती दिली. जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांनी आरोग्य सेवेबाबत वेळोवेळी दक्षता घेऊन याबाबत निर्देश दिलेले आहेत. या निर्देशानुसार नांदेड जिल्ह्यातील या उपक्रमात अधिकाधिक मुलांना समावून घेत असल्याची माहिती त्यांनी दिली. पालकांनीही कोणाच्या मुलांना जर आजार असेल तर पुढे यावे असे आवाहन त्यांनी केले.
आज पुढील उपचारासाठी पाठविण्यात आलेल्या मुलांमध्ये भोकर तालुक्यातील 5, किनवट तालुक्यात 8, नांदेड तालुक्यातील 1, हदगाव तालुक्यातील 1, लोहा 3, कंधार 4, मुखेड 1, देगलूर 2, बिलोली 3, धर्माबाद 3, आणि उमरी येथील 1 मुलांचा समावेश आहे. यातील 6 बालक नागपूर येथील नेल्सन हॉस्पिटल येथे उपचारासाठी तर 26 बालक हे वर्धा येथील आचार्य विनोबा भावे ग्रामीण रुग्णालय वर्धा येथे पाठविण्यात आले आहेत. या सर्व मुलांवर राष्ट्रीय बाल स्वास्थ्य कार्यक्रम व महात्मा जोतिबा फुले जनआरोग्य योजना अंतर्गत मोफत शस्त्रक्रिया व उपचार करण्यात येत आहेत.