तृतीयपंथीयांना देखील सन्मानाने जगण्याचा अधिकार - अस्लम शेख -NNL

तृतीयपंथीयांच्या समस्या सरकार दरबारी मांडून न्याय देऊ - संध्याताई सव्वालाखे


मुंबई|
तृतीयपंथीयांना देखील सन्मानाने जीवन जगण्याचा, स्वत:ची प्रगती व उन्नती करण्याचा अधिकार असून तृतीयपंथीयांना समाजाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी आपण कटिबद्ध आहोत अशी ग्वाही मुंबई शहर जिल्ह्याचे पालकमंत्री अस्लम शेख यांनी दिली.

मुंबई प्रदेश महिला कॉंग्रेस कमिटी व महिला कॉंग्रेस तृतीयपंथी सेलच्या माध्यमातून मालाड, मालवणी येथील रमजानअली शाळेच्या प्रांगणात तृतीयपंथीयांच्या विविध प्रश्नांसंदर्भात आयोजित करण्यात आलेल्या विशेष चर्चासत्र व स्वयं विकास प्रशिक्षण कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमात मंत्री अस्लम शेख बोलत होते.

वर्षानुववर्षे तृतीयपंथीयांना उपेक्षित जीवन जगावे लागत आहे. वर्षानुवर्षे ह्या समाजाला मुलभूत मानवी हक्क मिळविण्यासाठी देखील झगडावे लागत आहे. ओळखपत्र, मालमत्ता हक्क, निवारा अशा विविध बाबींसाठी आजही तृतीयपंथीयांना लढा द्यावा लागत आहे. वयोवृद्ध तृतीयपंथीयांची अवस्था तर फारच बिकट आहे. तृतीय पंथीयांच्या उन्नती व प्रगतीसाठी व त्यांना सन्मानाने जीवन जगता यावे यासाठी विविध शासकीय योजनांची माहिती त्यांच्यापर्यंत पोहोचण्याची आवश्यकता आहे, असे मंत्री अस्लम शेख यांनी सांगितले.

कौशल्य विकासाच्या माध्यमातून तृतीयपंथीयांना स्वत:ची उन्नती करुन घेण्याची संधी मिळू शकेल. यासाठी अशा प्रकारची प्रशिक्षण शिबिरं आयोजित करुन तृतीय पंथीयांमधील कौशल्य विकास करुन त्यांना रोजगारक्षम बनविण्याचा महिला कॉंग्रेसचा उपक्रम अतिशय स्तुत्य असल्याचे सांगून मंत्री शेख यांनी या उपक्रमाचे कौतुक केले.

तृतीयपंथीयांच्या विविध समस्या सरकारी दरबारी मांडून त्यांना न्याय देण्याचे काम करु असे आश्वासन महिला काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षा संध्याताई सव्वालाखे यांनी दिले. त्रिवेणी समाज विकास केंद्र या संस्थेला संध्याताई यांच्या हस्ते पाच लाख रुपयांची देणगी देण्यात आली, तृतीयपंथीयांना साडी वाटप करण्यात आले तसेच जेवणही देण्यात आले.

महाराष्ट्र प्रदेश महिला काँग्रेस कमिटी व तृतीयपंथी सेल, अखिलेश सामाजिक संस्था, खुशी बहुद्देशीय संस्था यांनी आयोजित कार्यक्रमात वस्त्रोद्योगमंत्री अस्लम शेख, महाराष्ट्र प्रदेश महिला काँग्रेस कमिटीच्या अध्यक्षा संध्याताई सव्वालाखे, महाराष्ट्र प्रदेश महिला काँग्रेस जनरल सेक्रेटरी व NGO सेलच्या अध्यक्षा उज्वला साळवे, तृतीयपंथी सेल समन्वयक ॲड. पवन यादव, परेश शेठ, राजन काळे, प्रवीण पाटील, जयेश खाडे आदी यांच्यासह शेकडो तृतीयपंथी उपस्थित होते.

 

Post a Comment

please do not enter any spam link in the comment box

Previous Post Next Post
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी