नांदेड| सुर्यकांत वाणी यांच्यासारख्या ध्येयवादी कार्यकर्त्यांकडूनच सामाजिक व कष्टकर्यांच्या चळवळीला बळ मिळत असते, असे मत कॉ.के.के.जांबकर यांनी व्यक्त केले.
जनता दलाचे महासचिव सुर्यकांत वाणी यांना सदाशिवराव पाटील फाऊंडेशनच्यावतीने कार्यकर्ता गौरव पुरस्कार जाहीर झाल्याबद्दल वाणी यांचा भारतीय कम्युनिस्ट पक्ष कार्यालयात कॉ.के.के.जांबकर यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. यावेळी बोलतांना कॉ.जांबकर म्हणाले की, सध्या चळवळी मंदावल्याचे सगळेजण सांगतात. समाजाला चळवळींची अत्यंत गरज आहे. चळवळीत सर्वस्व अर्पण करणार्या कार्यकर्त्यांचा सध्याच्या स्थितीत वानवा जाणवत आहे.
सुर्यकांत वाणी यांनी स्वतःची, कुटुंबाची, प्रकृतीची काळजी न करता जनता दल आणि शेतकरी, शेतमजूर, कष्टकर्यांच्या चळवळीत निष्ठेने काम केले आहे. त्यांच्यासारख्या व्यक्ती राजकीय, सामाजिक चळवळींना बळ देत असतात, असे जांबकर यांनी यावेळी सांगितले. यावेळी डॉ.किरण चिद्रावार, प्रा.डॉ.लक्ष्मण शिंदे यांनी सुर्यकांत वाणी यांच्या कार्याचा गौरव केला. कार्यक्रमाचे प्रास्ताविक भाकपाचे जिल्हा सचिव ऍड.कॉ. प्रदीप नागापूरकर यांनी तर आभार प्रदर्शन कॉ.वैशाली धुळे यांनी केले. यावेळी सफाई कामगार, ग्राम पंचायत कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.