जिल्हाधिकारी, उपविभागीय अधिकारी, तहसीलदार, नगरपंचायत प्रशासनाला दिले निवेदन
हिमायतनगर, अनिल मादसवार| नगरपंचायत मध्ये प्रशासक असून सुध्दा शहरातील पथदिवे अनेक महिन्यापासून बंद आहेत. विद्यमान आमदार साहेबांच शहराकडे दुर्लक्ष असल्यामुळे शहरात काळोख पसरला आहे. तत्काळ शहरातील अंधार दूर करण्यासाठी संबंधितांनी प्रयत्न करून जनतेची होणारी कुचंबणा थांबवावी अशी मागणी एका निवेदनाद्वारे स्वाभिमानी संभाजी ब्रिगेडने तहसीलदार, महावितरण विभागाला केली आहे. अन्यथा शहराच्या हितासाठी मैदानात उतरावे लागेल असा इशाराही त्यांनी नांदेड न्यूज लाईव्हशी बोलताना दिला आहे.
हिमायतनगर शहरात प्रशासक लागून जवळपास दिड वर्ष होत आहेत. तेव्हापासून शहरातील नागरिकांना विविध नागरी समस्यांचा सामना करावा लागत आहे. असे असताना याकडे शहराचे भाग्यविधाते म्हणून घेणाऱ्या राजकीय पुढाऱ्यासह सत्ता भोगून गडगंज संपत्ती जमविलेल्या पुढाऱ्यांनी दुर्लक्ष केल्याने हिमायतनगर शहर गेल्या महिन्या भरापासून अंधारात आहे. त्यामुळे शहरातील ९० टक्के भागात काळोख पसरला असून, उमर चौक ते पोलीस ठाणे पर्यंतच्या रस्त्यावर मात्र रात्रीला झगमगाट दिसत आहे. या प्रकाराला पाहणाऱ्या शहरातील नागरिकातुन राजकीय नेत्यांच्या दुटप्पी धोरणामुळे शहरात काळोख पसरला असल्याचा आरोप केला जात आहे.
५ वर्ष नगरपंचायतीवर सत्ता भोगणाऱ्या तत्कालीन सत्ताधार्यांनी महावितरण कंपनीचे देयके भरण्याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करून स्वहित साधून घेतल्यामुळे आजघडीला नागरपंचायतीवर महावितरण विभागाकडून वापरण्यात येणाऱ्या सार्वजनिक पथदिव्यांसह पाणीपुरवठा आणि इतर वीज वापराची मिळून १४ लाखाहून अधिकची थकबाकी राहिली आहे. त्यामुळे महावितरण कंपनीने शहराचा वीज पुरवठा खंडित केल्याने महिन्याभरापासून शहर अंधारात असल्याने शहरात चोरी, लूटमार, रात्रीला ये-जा करताना अनेक वृद्ध व सायकल धारक विद्यार्थी खाली पडून जखमी होत आहेत.
तसेच खाजगी क्लासेसला ये -जा करणाऱ्या मुली, दर्शनासाठी येणाऱ्या महिला व वृद्धांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागतो आहे. या सर्व प्रकारास नगरपंचायत प्रशासनाचा आणि तत्कालीन पुढाऱ्यांचा नाकर्तेपणा कारणीभूत आहे. असा आरोप करत हिमायतनगर येथील स्वाभिमानी संभाजी ब्रिगेडने शहरातील पथदिवे चालू करण्याची मागणीसाठी तहसीलदार डी.एन.गायकवाड, महावितरणचे उपकार्यकारी अभियंता नागेश लोणे, नगरपंचायत प्रशासनाची भेट घेऊन याबाबतचे निवेदन देऊन तात्काळ शहरातील अंधार दूर करून नागरिकांना दिलासा द्यावा अशी मागणी केली आहे.
तसेच या निवेदनाची प्रत ऊर्जामंत्री, जिल्हाधिकारी नांदेड,उपविभागीय अधिकारी हदगाव, यांच्याकडे पाठविले आहेत. तात्काळ वीजपुरवठा सुरु करावा शी मागणी स्वाभिमानी संभाजी ब्रिगेड हिमायतनगर शहराध्यक्ष बालाजी ढोणे, मुन्ना शिंदे, निलेश चटणे, प्रशांत ढोले, महेश काळे, अनिल गोरेकर, सुनील शेळके, दिनेश डुडुळे, ओम राखा, बाळू गरोळे, प्रदीप नवसागरे, नागेश बुरकुंठवाड आदींनि केली आहे.