मयताच्या नातेवाईकांनी घेतली पालकमंत्र्यांसह पोलिस अधीक्षकांची भेट
नांदेड| शहरातील राजेशनगर, तरोडा नाका नांदेड येथील संदिपान रामकिसन खंदारे यांनी पत्नी व सासरच्या मंडळींकडून होणार्या नेहमीच्या शारीरिक, मानसिक त्रासास कंटाळून दि. १५ फेब्रुवारी २०२२ रोजी गळफास लावून आत्महत्या केली होती. ही घटना घडून १५ दिवस लोटले तरीही भाग्यनगर पोलिसांकडून अद्याप आरोपींना अटक करण्यात आली नसल्याने यात काहीतरी काळंबेरं असल्याचे बोलल्या जात आहे.
मयत संदिपान खंदारे यांच्या नातेवाईकांनी दि. २८ फेब्रुवारी २०२२ रोजी जिल्हा पोलिस अधीक्षक नांदेड यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, मयत संदिपान रामकिसन खंदारे यांचा विवाह आनंदराव बेगाजी गायकवाड यांची कन्या स्नेहल यांच्याशी झाला होता. काही वर्षे संसार चांगला चालल्यानंतर स्नेहलची आई गोदावरी आनंदराव गायकवाड, सासरे आनंदराव गायकवाड, मेहुणी नम्रता गायकवाड, मेहुणा प्रथमेश गायकवाड यांनी संदिपान खंदारे यांच्यासह त्यांच्या आईवडिलांना संदिपान खंदारेची मालमत्ता स्नेहलच्या नावाने करण्यासाठी मानसिक त्रास द्यायला सुरुवात केली. या दरम्यान त्यांनी संदिपान खंदारे यांना धमक्या देणे, मारहाण करणे असे प्रकार सुरु झाले. याबाबत संदिपान खंदारे यांचे आईवडिलांनी स्नेहलच्या आईवडिलांची समजूत काढण्याचा प्रयत्न केला तरीपण त्यांच्यात कोणतीच सुधारणा न होता त्यांच्या त्रासात उलट वाढच झाली.
या त्रासास व समाजात होत असलेल्या बेअब्रूने संदिपान खंदारे यांचे वडिल जे की, महाराष्ट्र राज्य खादी व ग्रामोद्योग मंडळ जिल्हा ग्रामोद्योग अधिकारी या पदावर असलेले रामकिसन खंदारे यांनी स्नेहल व गायकवाड कुटुंबियांकडून होणार्या वाईट वागणुकीमुळे समाजात बेअब्रू झाल्यामुळे तसेच नेहमीच्या धमक्यांमुळे खचून जाऊन आजारी पडून १५ दिवसांत त्यांचे निधन झाले. ही घटना संदिपान खंदारे यांच्या आईच्या जिव्हारी लागल्यामुळे व आपल्या मुलाच्या आयुष्याचे वाटोळे झाल्याचे समजून आल्याने त्यांच्या आईने दुसर्याच दिवशी प्राण सोडले. संदिपान खंदारे यांचे आईवडिल गायकवाड कुटुंबियांच्या प्रचंड दहशतीत होते असे संदिपान खंदारे यांच्या बहिणींनी दिलेल्या निवेदनात नमूद केले आहे.
आईवडिल गेल्यानंतर संदिपान खंदारे हे एकटे पडल्याचे पाहून स्नेहल व गायकवाड कुटुंबियांकडून छळात वाढच झाली व संदिपान खंदारे यांना तुझी संपत्ती माझ्या मुलीच्या नावाने कर नाहीतर तुझे तुकडे-तुकडे करतो, तुला जगू देणार नाही अशा धमक्या वारंवार देण्यात येत असल्याने त्यांनी त्यांच्या डायरी व सुसाइड नोटमध्ये लिहून आत्महत्या केली असून सदर डायरी व सुसाईड नोट भाग्यनगर पोलिसांनी जप्त केली आहे. तसेच दि. १४ व १७ सप्टेंबर २०२० मध्ये याबाबत भाग्यनगर पोलिस ठाण्यात तक्रार दिली होती. तसेच उमरखेड पोलिस ठाणे येथेही तक्रार करण्यात आली होती. परंतु पोलिसांनी त्यावेळी कोणतीही कार्यवाही न केल्यामुळे गायकवाड कुटुंबियांचे मनोबल वाढून त्यांनी त्रासात अधिकच भर घातली. पण मानसिक खच्चीकरण झालेल्या संदिपान खंदारे यांनी दि. १५ फेब्रुवारी २०२२ रोजी गळफास लावून आपली जीवनयात्रा संपवून टाकली.
याबाबत मयत संदिपान खंदारे यांच्या बहिणींनी भाग्यनगर पोलिस ठाण्यात स्नेहल खंदारे व गायकवाड कुटुंबियांविरोधात तक्रार करुन सुद्धा पोलिसांकडून कसल्याच प्रकारची कार्यवाही होत नसल्याने तसेच आरोपी मोकाट फिरत असल्यामुळे आपल्या मयत भावाला न्याय मिळावा याकरीता मयत संदिपान खंदारे यांच्या बहिणींनी दि. २८ फेब्रुवारी २०२२ रोजी पोलिस अधीक्षक नांदेड यांची भेट घेऊन आरोपींना तात्काळ अटक करावी अशी मागणी केली आहे. जर अटक नाही झाली तर सनदशीर मार्गाने आंदोलन छेडण्याची भूमिका घेण्यात येईल असेही निवेदनात नमूद केले आहे. सदर निवेदनाच्या प्रती राज्याचे मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, पालकमंत्री, नांदेड, गृहमंत्री, जिल्हाधिकारी यांना दिल्या आहेत. याबाबत आता भाग्यनगर पोलिस काय भूमिका घेतात याकडे सर्व जनतेचे लक्ष लागले आहे.