उपमुख्य कार्यकारी अधिकारी यांचे आश्वासन
नांदेड| मागील दहा-बारा वर्षांपासून नांदेड तालुक्यासह जिल्ह्यातील ग्राम पंचायत कर्मचार्यांचे प्रलंबित प्रश्न येत्या एप्रिल अखेर निकाली काढण्यात येतील, असे स्पष्ट आश्वासन जिल्हा परिषद पंचायत विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी डॉ.नामदेव केंद्रे यांनी आयटक प्रणित नांदेड जिल्हा ग्रामपंचायत कर्मचारी महासंघ सोबत घेतलेल्या व्यापक बैठकीत दिले आहे.
ग्राम पंचायत कर्मचार्यांना अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेला राहणीमान भत्ता द्यावा, कर्मचार्यांचे भविष्य निर्वाह निधी खात्यात कामगार व व्यवस्थापनाचा निधी जमा करावा, विनाकारण राजकीय द्वेषापोटी कमी केलेल्या ग्राम पंचायत कर्मचार्यांना पूर्ववत कामावर घ्यावे, किमान वेतन कायद्याची अंमलबजावणी करावी या व इतर मागण्यांसाठी आयटक प्रणित नांदेड जिल्हा ग्राम पंचायत कर्मचारी महासंघ (लाल बावटा) च्या वतीने वारंवार पंचायत समिती जिल्हा परिषदेसमोर आंदोलने करण्यात आली होती. याची दखल घेवून जिल्हा परिषद पंचायत विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. नामदेव केंद्रे यांच्या उपस्थितीत नांदेड पंचायत समिती सभागृहात पंचायत समितीचे अधिकारी, विविध विभागातील ग्रामसेवक, ग्रा.पं.कर्मचारी व संघटना प्रतिनिधींची संयुक्त बैठक घेण्यात आली.
या बैठकीत विविध प्रश्नांवर चर्चा झाल्यानंतर एप्रिल अखेर पर्यंत ग्रामपंचायत कर्मचार्यांचे सर्व प्रलंबित प्रश्न निकाली काढल्या जातील, असे आश्वासन यावेळी केंद्रे यांनी संबंधीतांशी चर्चा करुन दिले. या बैठकीस गटविकास अधिकारी अनिता सरोदे, जी. व्ही. मांजरमकर, विकास अधिकारी वाघमारे, डी.के. आडे, जिल्ह्यातील ग्रामपंचायतीचे ग्रामसेवक, गटविकास अधिकारी यांच्यासह संघटनेचे प्रतिनिधी कॉ.के.के. जांबकर, कॉ. शिवाजी शेजुळे, कॉ. हणमंत मगरे, कॉ.हर्षवर्धन आठवले, कॉ.गणेश शिंदे, कॉ. परसराम पुंडे, कॉ. नागोराव पुयड, कॉ.पांडुरंग पावडे, कॉ.माधव भिसे यांच्यासह ग्रा.पं.कर्मचारी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.