नांदेड| केंद्रावर सुरू असलेल्या महाराष्ट्र राज्य हौशी मराठी नाट्य स्पर्धेत शक्ती बहुद्देशीय सेवाभावी प्रतिष्ठाण, नांदेडच्या वतीने गिरीश जोशी लिखित, प्रमोद देशमुख दिग्दर्शित "फायनल ड्राफ्ट" या नाट्य प्रयोगाचे सादरिकरण झाले. फिल्म अँड टेलिव्हिजन अकादमीचा एक प्रोफेसर आणि एक विद्यार्थिनी या दोघांभोवती फिरणारे हे कथानक प्रेक्षकांना मात्र भुरळ घालते. यातील फ्रोफेसर आपली विद्यार्थिनीस एका काल्पनिक विषयावर लिखाण करण्यास सांगतात आणि ती करत असलेलं लिखाण हे काल्पनिक नसून तिचे आत्मचरित्र आहे असे प्रोफेसरला वाटते. आणि त्यानंतर त्या काल्पनिक कथेचे वेग वेगळे ड्राफ्ट तयार होतात. वेगवेगळा अभ्यास सुरू होतो आणि त्यातूनच हे नाटक घडत जाते.
या नाटकात विद्यार्थिनीची भूमिका पूर्वा देशमुख यांनी उत्तम साकारली त्यांच्या अभिनयातील सहजपणा त्या पात्राची उंची वाढवते तर आपल्या अनुभवाचा कस लावत प्रमोद देशमुख यांनी प्रोफेसरची भूमिका साकारली. तर राम चव्हाण यांची प्रकाशयोजना आशयपूर्ण होती. या नाटकाचे नेपथ्य: ऋतुजा रत्नपारखी, पार्श्वसंगीत : सुषेण रत्नपारखी, वेशभुषा : अश्विनी प्रमोद देशमुख, रंगभूषा : वर्षा देशमुख, रंगमंच व्यवस्था : संदिप रत्नपारखी, अनिल खामकर समर्थ देशमुख, प्राची देशमुख, यांनी सांभाळली.
स्पर्धेला रसिक प्रेक्षकांचा उदंड प्रतिसाद लाभत आहे म्हणून नाट्य प्रयोग सादर करणाऱ्या कालावंतांमध्ये समाधानाचे वातावरण आहे. यातूनच स्पर्धेचे समन्वयक दिनेश कवडे हे स्पर्धेसंदर्भात घेत असलेली मेहनत दिसत आहे. स्पर्धा यशस्वीतेसाठी सुधांशू सामलेट्टी, अक्षय राठोड, स्नेहा बिरादार, निवृत्ती कदम, गौतम गायकवाड, संदेश राऊत, प्रितम भद्रे हे मदतनीस म्हणून काम पाहत आहेत.
आज. १० मार्च रोजी शुभंकरोती फाऊंडेशन, नांदेडच्या वतीने किरण पोत्रेकर लिखित, किरण चौधरी दिग्दर्शित "एक परी" या नाट्य प्रयोगाचे सादरीकरण होणार आहे. दिनांक ११ मार्च रोजी ज्ञान संवर्धन शिक्षण प्रसारण मंडळ, नांदेड च्या वतीने राहुल जोंधळे लिखित, दिग्दर्शित "जय भिम निळासलाम" या नाट्य प्रयोगाचे सादरीकरण होणार आहे.