नांदेड| जलव्यवस्थापन चांगल्या पद्धतीने केले तरच पाण्याच योग्य वापर होऊन संपूर्ण पृथ्वी हिरवी गार होऊ शकते.असे प्रतिपादन प्रा. डॉ. भागवत पस्तापुरे यांनी केले ते मुजापेठ येथे कै. वसंतराव काळे वरिष्ठ महाविद्यालय देगलूर नाका नांदेड द्वारा आयोजित सात दिवसीय विशेष युवक शिबिरात मार्गदर्शन करताना बोलत होते.
यावेळी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ उस्मान गणि हे होते. प्रास्ताविक राष्ट्रीय सेवा योजना कार्यक्रम अधिकारी प्रा बाबासाहेब भुकतरे यांनी केले. पुढे डॉ. पस्तापुरे म्हणाले की पाणी ही समस्त जीवांची मूलभूत गरज आहे, त्यामुळे पाण्याचे योग्यअसे व्यवस्थापन झाले पाहिजे. पाणी उपयोगात आणत असताना त्याचा वापर काळजीपूर्वक केला पाहिजे. 'पाणी आडवा पाणी जिरवा' हा उपक्रम सर्वांनी अंमलात आणला पाहिजे तरच पृथ्वीवर हरित आच्छादन निर्माण होऊन संपूर्ण पृथ्वी हिरवी गार होऊ शकते.
यावेळी पीपल्स महाविद्यालय नांदेडचे राष्ट्रीय सेवा योजना कार्यक्रम अधिकारी प्रा. डॉ. अमोल काळे यांनीदेखील राष्ट्रीय सेवा योजनेचे महत्त्व या विषयावर विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. राष्ट्रीय सेवा योजना च्या माध्यमातून युवक देश घडवण्यात मोलाची भूमिका पार पाडू शकतात. युवकांमध्ये श्रमसंस्कार आणि श्रमआदर निर्माण होण्यास मदत होते.
राष्ट्रीय सेवा योजना ही विद्यार्थ्यांचे सर्वांगीण व्यक्तिमत्व घडवण्यात मोलाचे योगदान देत असते, त्यामुळे विद्यार्थी जीवनात प्रत्येक विद्यार्थ्याने राष्ट्रीय सेवा योजना मध्ये सहभागी होऊन आपले व्यक्तिमत्व परी पूर्णपणे घडवले पाहिजे असे मत डॉ. काळे यांनी व्यक्त केले कार्यक्रमाचा अध्यक्षीय समारोप प्राचार्य डॉ. उस्मान गनी यांनी केला. सूत्रसंचालन प्रा.नुरी मॅडम यांनी केले तर आभार राष्ट्रीय सेवा योजना प्रतिनिधी कुरेशी मोहम्मद दाईम याने मानले. कार्यक्रमास प्रा. निजाम सर, प्रा.शेख नजीरसर , प्रा.तहरीम मॅडम, प्रा. दानिश सर, अक्षय हासेवाड आणि राष्ट्रीय सेवा योजनेचे स्वयंसेवक उपस्थित होते. कार्यक्रमाची सांगता राष्ट्रगीताने करण्यात आली.