मुंबई| नांदेड जिल्ह्यात देहव्यापर करणाऱ्या महिलांच्या निधीत भ्रष्टाचार झाल्याची बातमी एका वृत्तवाहिनीने प्रसिद्ध केल्यानंतर या बातमीचा दाखल देत विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत तारांकित प्रश्न उपस्थित करून सरकारचे लक्ष वेधले आहे.
गेली दोन वर्षपाऊसन कोरोनाच्या प्रादुर्भावाने सर्वच जण हैराण झाले होते. याचा फटका देहव्यापार करणाऱ्या महिलांनाही बसला आहे. रोजगार गेल्यामुळे देहव्यापर करून उदरनिर्वाह करणार्या महिलांची कोविड कालावधीत उपासमार होऊ नये यासाठी शासनाने आर्थिक मदत करण्याचा निर्णय घेतला होता. या निर्णयांतर्गत देहव्यापर करणाऱ्या महिलांना दरमहा ५ हजार रुपये, तर ज्या महिलांची मुले शाळेत जातात अशा महिलांना अतिरिक्त २ हजार ५०० रुपये देण्याचा निर्णय घेण्यात आला होता. यासाठी मुख्यमंत्री सहाय्यता निधीमधून ५१ कोटी १८ लाख ९७ हजार ५०० रुपये निधी उपलब्ध करुन देण्यात आला होता.
शासनाच्या निर्णयानुसार, नांदेड जिल्ह्यासाठी २ कोटी ८१ लाख ६५ हजार ५०० रुपये निधी उपलब्ध झाला. या निधीपैकी १ हजार ३६ महिलांना व त्यांच्या ६६२ बालकांना २ कोटी ४ लाख ९० हजार रुपये वाटप करण्यात आले. अशी माहिती जिल्हा व महिला बाल विकास अधिकार्यांनी दिली होती. मात्र सरकारने दिलेले अनुदान आपल्याला प्राप्त झालं नसल्याचे शहरातील आणि जिल्ह्यातील महिलांनी सांगितल्याचे समोर आले आहे.
यातील काही महिलांना संबंधीत संस्थेने संपर्क साधला होता, परंतु बदनामीच्या भितीने कुठलेही कागदपत्र दिले नसल्याचे त्यांनी सांगितले. विशेष म्हणजे अर्थ सहाय्य करताना कोणत्याही ओळखपत्राचा आग्रह न करण्याचे निर्देश देण्यात आले होते. मात्र नांदेडात ओळखपत्राची मागणी करण्यात आली. त्यामुळे बहुतांश महिलांना अनुदान मिळाले नाही. संबंधित संस्थेने प्रत्यक्ष काम करणार्या महिलांशी संपर्क न साधल्याने तब्बल दोन २ रुपयाचे वाटप कुणास करण्यात आले..? असा प्रश्न उपस्थित केल्या आहे.
जवळपास दोनशेहून अधिक महिलांचे अनुदान लाभाचे अर्ज जिल्हा महिला व बाल कल्याण कार्यालय नांदेड यांच्याकडून भरून घेऊन सुद्धा संबंधित देहव्यापर करणाऱ्या महिलांना कोणतीही अनुदानाची रक्कम मिळाली नसल्याची माहिती देहव्यापर करणाऱ्या महिलांनी नाव न सांगण्याच्या अटीवर एका 'वृत्त वाहिनी'शी बोलताना सांगितली होती. त्यामुळे नांदेड जिल्ह्यासह महाराष्ट्रातही अशा प्रकारे बोगस वेश्या व्यवसाय करणारे लाभार्थी दाखवून राज्याच्या महिला व बालविकास विभागाने दिलेल्या ह्या निधीत भ्रष्टाचार झाल्याचा आरोप करण्यात येतो आहे. त्यामुळे या निधी वाटपाची चौकशी करण्याची मागणी नांदेड जिल्ह्यातील विविध सामाजिक संघटना व सामाजिक कार्यकर्त्यांनी केली आहे. त्याचा बरोबर आता विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत तारांकित प्रश्न उपस्थित करून सरकारचे लक्ष वेधले आहे.
संदर्भ - 'एबीपी माझा' - https://marathi.abplive.com/news/maharashtra/nanded-news-corruption-in-funds-for-prostitutes-in-nanded-district-maharashtra-1030091