नांदेड। शहरात सर्वत्र धुळवड सुरू असताना आज दुपारी 4 वाजेच्या सुमारास माळटेकडी पुलावर गोळीबार झाला आहे, या घटनेत एक युवक जखमी झाला आहे. ही वार्ता समजताच पोलीस अधिकारी व कर्मचारी घटनास्थळावर दाखल होऊन तपास करत आहेत.
राज्यभरात आणि नांदेड शहरात सर्वत्र रंगपंचमीचा सण उत्साहात साजरा केला जात असताना, शहरातील विमानतळ पोलीस ठाणे हद्दीत येणाऱ्या माळटेकडी पुलावर जीवघेण्याच्या उद्देशाने गोळीबार झाल्याची खळबळ जनक घटना समोर आली आहे. गोळीबार करणारा घटनास्थळावरून पसार झाला आहे. घटनेची माहिती मिळताच मोठा पोलीस फौजफाटा तेथे पोहचला. यात पोलीस उपअधीक्षक डॉ.सिद्धेश्वर भोरे, पोलीस निरीक्षक प्रशांत देशपांडे, भगवान धबडगे, द्वारकादास चिखलीकर, संजय ननवरे यांचा समावेश आहे.
या ठिकाणी कोण्यातरी अज्ञाताने 35 वर्षीय युवक दीपक बिगानिया यांचेवर गोळीबार केल्याने तो जखमी झाला आहे. जखमी युवकावर शासकीय रुग्णालयात उपचार सुरू आहेत, त्याच्या जबाणीनंतर गोळीबार करणारा कोण हे पुढे येईल.