आ. राजूरकरांच्या प्रश्नाला जलसंपदामंत्र्यांचे उत्तर
मराठवाडयातील पाणीप्रश्नांसाठी पालकमंत्री अशोकराव चव्हाण ,जलसंपदामंत्री जयंत पाटील व सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे यांनी पुढाकार घेऊन मराठवाडयाच्या हक्काचे ६४ टी.एम.सी. पाणी शासनाकडून मंजूर करून घेतल्या बद्दल आ.अमरनाथ राजूरकर यांनी त्यांचे आभार मानले.मात्र त्या संबंधीचे उपलब्धता प्रमाणपत्र अद्याप मिळाले नाही ते केंव्हा मिळणार आहे असा प्रश्र्न आ. राजूरकर यांनी विचारला.
तेंव्हा येत्या आठ दिवसात हे प्रमाणपत्र देण्यात येईल अशी ग्वाही जलसंपदामंत्री जयंत पाटील यांनी दिली आहे. आ.राजूरकर म्हणाले की,तेलंगणा सीमेवर नांदेड जिल्ह्यातील धर्माबाद तालुक्यातील बाभळी बंधाऱ्यातील आपले हक्काचे हजारो टी.एम.सी पाणी तेलंगणात वाहून जाते. शासनाने जर पाणी उलब्धतेच्या बाबतीत प्रमाणपत्र दिले तर पैनगंगा नदीवर ७ तर गोदावरी नदी खोऱ्यात २२ बराजेस बांधण्यात येणार असल्याने याचा लाभ होणार आहे.
परंतु पाणी उपलब्धता प्रमाणपत्र नसल्यामुळे हे बंधारे बांधणे शक्य नाही.त्यामुळे हे प्रमाणपत्र तत्काळ द्यावे अशी मागणी त्यांनी केली. त्यांची मागणी मान्य करीत जलसंपदा विभागाच्या वतीने प्रमाणपत्र येत्या आठ दिवसांत देण्यात येईल असे त्यांनी सांगितले. त्यामुळे नांदेड जिल्ह्यासह मराठवाडयातील पाणी प्रश्नांसाठीचे पालकमंत्री अशोकराव चव्हाण यांचे प्रयत्न आता फळाला येणार आहे.