रुग्णांच्या तपासणी व उपचारासाठी मुंबई येथील तज्ञ डॉक्टरांची टिम तब्बल दोन वर्षानंतर दाखल-NNL

आर.आर.मालपाणी मतिमंद विद्यालयात आरोग्य शिबीरास प्रारंभ

जिल्हाधिकारी डॉ. विपिन इटनकरसह विविध मान्यवरांनी दिली भेट


नांदेड|
कोरोना या वैश्विक महामारीचा प्रादुर्भाव होवू नये यासाठी शासनाने दोन वर्षापासून लॉकडाऊन जाहीर केले होते. यामुळे मेंदूचे विकार असणाऱ्या मुलामुलींचे आरोग्य शिबीर तब्बल दोन वर्षापासून होऊ शकले नाही. कोरोना रुग्ण संख्या घटल्याने पुन्हा मुंबई येथील जय वकील फांउडेशन अँड रिसर्च सेंटर, बि.जे.वाडिया चिल्ड्रेन्स हॉस्पिटल, एसआरसीसी चिल्ड्रेन्स हॉस्पिटल व येथील राजस्थानी एज्युकेशन सोसायटीच्या वतीने आर. आर. मालपाणी मतिमंद विद्यालयात आयोजित करण्यात आलेल्या मेंदूविकार रुग्णांसमवेत यावर्षी प्रथमच अस्थिव्यंग व हृदयविकार असणाऱ्या  मुला-मुलींच्या शिबिरास  गुरुवार दि. २४ मार्च रोजी प्रारंभ झाला. तीन दिवस चालणाऱ्या या आरोग्य शिबिरासाठी मुंबई येथील तब्बल ४० तज्ञ डॉक्टरांची टिम दाखल झाली आहे. यावेळीही आरोग्य शिबिरास मोठा प्रतिसाद मिळाला आहे. जिल्हाधिकारी डॉ. विपिन इटनकरसह विविध मान्यवरांनी आरोग्य शिबिरास भेट देवून सर्वसामान्य रुग्णावर मोफत उपचार करण्यात येणाऱ्या कामाची प्रशंसा केली आहे.

आरोग्य शिबिरात तपासणी व उपचारासाठी मराठवाडा, विदर्भ, आंध्रप्रदेश, कर्नाटक आदी राज्यातून रुग्ण येतात. रुग्ण व त्यांच्या समवेत आलेल्या नातेवाईकांची गैरसोय होऊ नये यासाठी राजस्थानी एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष ओमप्रकाश गिल्डा, सचिव प्रकाश मालपाणी, बनारसीदास अग्रवाल, कमल कोठारी, डॉ. लक्ष्मीकांत बजाज, अंकित अग्रवाल आदी पदाधिकारी व मूख्याध्यापक नितीन निर्मल शिबीर स्थळी पूर्णवेळ उपस्थित आहेत.

आरोग्य शिबीरातील रूग्णांवर प्रसिध्द बालमस्तिष्करोग तज्ञ डॉ. अनैता हेगडे, डॉ. प्रज्ञा गाडगीळ, डॉ. सुहानी, डॉ. श्रेया, डॉ चिन्मय चौधरी, डॉ. सचिन रस्तोगी, फिजिओ थेरपिस्ट आशा चिटणीस, डॉ. रुखैया मिठाईवाला, डॉ. तृप्ती निखारगे, डॉ. तिवारी डॉ. ऐश्वर्या स्वामीनाथन यासह तब्बल ४० तज्ञ डॉक्टरांची टीम आरोग्य शिबिरात रुग्णांची तपासणी व उपचार करीत आहेत. राष्ट्रीय बाल स्वास्थ्य कार्यक्रमांतर्गातील सर्वेत जिल्ह्यातील अनेक रुग्ण आढळले होते. तालुका आरोग्य अधिकारी सह त्याची वैद्यकीय टिम  या रुग्णांच्या उपचारासाठी शिबीर स्थळी दाखल झाली आहे. या रुग्णांवरही शिबिरात उपचार करण्यात येत आहे.

जिल्हाधिकारी डॉ. विपिन इटनकर यांनी केली उपक्रमाची प्रशंसा 

येथील जिल्हाधिकारी डॉ. विपिन इटनकर यांनी गुरुवारी आरोग्य शिबिरास भेट देऊन याबाबतची माहिती घेतली. ग्रामीण भागातील गरीब गरजू रुग्णांना या शिबिराचा लाभ मिळत असल्याचे पाहून त्यांनी या उपक्रमाची प्रशंसा केली आहे. आरोग्य शिबीराचे हे बारावे  वर्ष असून २१ वे शिबीर आहे. आता पर्यंत झालेल्या २०  आरोग्य शिबीराचा ५ हजार रूग्णांना लाभ झाला आहे. तसेच अनेक अस्थिव्यंग व नेत्र रूग्णांवर मुंबई येथील तज्ञ डॉक्टरांनी शस्त्रक्रिया केली आहे. यावर्षी प्रथमच अस्थिव्यंग व हृदयविकाराच्या रुग्णांची तपासणी व उपचार करण्यात येत आहे. 

आरोग्य शिबिरात तपासणी केलेल्या रुग्णांना सहा महिन्यांची म्हणजेच आगामी आरोग्य शिबिरा पर्यंतची मोफत औषधी देण्यात येते तसेच आवश्यकते नुसार रुग्णांना दररोज शाळेतील राजस्थानी एज्युकेशन सोसायटीच्या डॉ. एम. जी. बजाज रिहॅब्लीटेशन सेंटर येथे फिजीओ थेरपीची सोय उपलब्ध करून देण्यात आली आहे. आरोग्य शिबीर यशस्वी व्हावे यासाठी संस्था पदाधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली मूख्याध्यापक नितीन निर्मल,  वसतीगृह अधीक्षक संजय शिंदे व आर.आर. मालपाणी मतिमंद विद्यालय व श्री रामप्रताप मालपाणी मूक बधिर विद्यालयाचे कर्मचारी, संस्कृती सेवा मंडळाचे स्वयंसेवक परिश्रम घेत आहेत.

Post a Comment

please do not enter any spam link in the comment box

Previous Post Next Post
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी