नांदेड| नांदेड जिल्ह्यातील साईभक्तांना साई दर्शनासाठी नांदेड जिल्ह्यातच सुविधा उपलब्ध व्हावी या अनुषंगाने श्री साईबाबा मंदिर शिर्डी च्या धर्तीवर खा.प्रतापराव पाटील चिखलीकर यांच्या संकल्पनेतून नांदेड - लातूर रोड वरील धनगरवाडी येथे उभारण्यात आलेल्या श्री साईबाबा मंदिर कलशारोहणच्या चौथ्या वर्धापन दिनानिमित्त भव्य कीर्तन महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. दि.26 मार्च ते 28 मार्च 2022 दरम्यान चालणाऱ्या या कार्यक्रमात विविध धार्मिक कार्यक्रमच आयोजन करण्यात आले असून खा.प्रतापराव पाटील चिखलीकर यांची यावेळी प्रमुख उपस्थिती राहणार आहे.
खा.प्रतापराव पाटील चिखलीकर यांच्या संकल्पनेतून अत्यंत भक्तीमय वातावरणात नांदेड लातूर रोड वरील धनगर वाडी येथे श्री साईबाबा मंदिराची स्थापना करण्यात आली. गेल्या चार वर्षापूर्वी उभारण्यात आलेल्या श्री साईबाबा मंदिराचा दि.26 मार्च 2022 रोजी चौथा वर्धापन दिन साजरा करण्यात येणार आहे. नांदेड जिल्ह्यातील साई भक्तांना श्री साई चरणी आपली भक्ती अर्पण करता यावी, श्री साईबाबांचे दर्शन घेऊन आपल्या दुःख मुक्तीसाठी याचना करता यावी , मन शुद्धीकरण करता यावे अशा विविध भक्तीमय उद्देशाने साकारण्यात आलेल्या श्री साईबाबा मंदिराचा कलशारोहण सोहळा चार वर्षापूर्वी पार पडला होता. दि.26 मार्च 2022 रोजी कलशारोहण सोहळ्याचा चौथा वर्धापन दिन आहे.
चतुर्थ वर्धापन दिनानिमित्त दि.26 मार्च 2022 रोजी भव्य कीर्तन महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. सकाळी सात वाजता महाभिषेक आणि मंत्रजागर होणार असून 9.30 वाजता सर्व संतमंडळी, प्रबोधनकार, मठाधिपती, कीर्तनकार यांचा खा.प्रतापराव पाटील चिखलीकर यांच्या हस्ते गौरव करण्यात येणार आहे. त्यानंतर सकाळी 11.00 वाजता श्री संत तुकाराम महाराज गाथा मंदिर श्री क्षेत्र देहू तालुका हवेली चे अध्यक्ष हरिभक्त पारायण परमपूज्य श्री गुरु पांडुरंग महाराज घुले यांच्या जाहीर कीर्तनाचे आयोजन करण्यात आले आहे .जाहीर कीर्तनानंतर महाप्रसादाचा कार्यक्रमही आयोजित करण्यात आला आहे.
दि.28 मार्च 2022 रोजी सकाळी 1 वाजता श्री साईबाबा मंदिर येथे श्रीनंदिकेश्वरची प्राण प्रतिष्ठापना करण्यात येणार आहे. या भव्य कीर्तन महोत्सवास जिल्ह्यातील साईबाबा भक्तांनी मोठ्या संख्येने उपस्थित रहावे असे आवाहन जिल्हा परिषदेचे सदस्य तथा भारतीय जनता पार्टीचे जिल्हा सरचिटणीस प्रवीण पाटील चिखलीकर, जिल्हा परिषद सदस्य तथा भाजपा महिला मोर्चाच्या प्रदेश उपाध्यक्षा सौ.प्रणिताताई देवरे चिखलीकर, लोहा कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती बालाजीराव पाटील मारतळेकर, भाजपा प्रदेश कार्यकारिणी सदस्य बाबूराव केंद्रे उमरगेकर, बोरी ग्रामपंचायतीचे सरपंच बालाजी झुंबाड यांनी केले आहे.