सार्वजनिक आरोग्यमंत्री राजेश टोपे यांच्याकडून राज्यातील महिला डॉक्टर, नर्सेस यांना पत्र-NNL

कोरोना काळातील सेवेबद्दल मानले आभार 

मुंबई|
सार्वजनिक आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी कोरोना काळातील अतुलनीय सेवेबद्दल राज्यातील महिला डॉक्टर, नर्सेस आणि आरोग्य कर्मचारी यांचे आभार मानले आहेत.

जागतिक महिला दिनाच्या पार्श्वभूमीवर सार्वजनिक आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी सर्व महिला डॉक्टर नर्सेस आणि आरोग्य कर्मचारी यांना पत्र लिहिले आहे. त्या पत्रात नमूद केले आहे की, जागतिक महिला दिनानिमित्त आपणा सर्व भगिनींसोबत या पत्राद्वारे संवाद साधताना आनंद होतो आहे. अडीच वर्षांपूर्वी राज्याचा आरोग्यमंत्री म्हणून मी जबाबदारी स्वीकारली. त्यानंतर काही काळातच कोरोनाचे संकट आपल्यासमोर उभे राहिले. या अनिश्चिततेच्या काळात कोरोना संकटाला राज्य अत्यंत धीरोदात्तपणे सामोरे गेले. या सगळ्यात महत्त्वपूर्ण वाटा होता तो राज्यातील महिला डॉक्टर्स, नर्सेस, वैद्यकीय अधिकारी, पॅरा मेडिकल, आशाताई, अंगणवाडी सेविका म्हणून कार्यरत असणाऱ्या तुम्हा सर्व भगिनींचा.

रुग्णसेवेहून मोठे दुसरे कार्य नाही. समाजातील अर्भकांपासून वृद्धांपर्यंत त्यांच्या प्राणांचे संरक्षण करण्यासाठी सीमेवर लढणाऱ्या सैनिकाप्रमाणे स्वत:चा जीव धोक्यात घालून तुम्ही लढलात. घर आणि काम या दोन्ही आघाड्यांवर जबाबदारी खंबीरपणे पेलली. तुमच्या तत्पर सेवेमुळे आणि अविरत मेहनतीने कोरोनामुक्त महाराष्ट्राकडे आपण वाटचाल करत आहोत. आतापर्यंत अत्यंत धीरानं आपण कोरोना विरुद्ध लढत आहात. समाजाच्या सेवेसाठी हे अतुलनीय शौर्य तुम्ही न थकता दाखवत आहात, असे श्री.टोपे यांनी नमूद केले आहे.

तुमच्या या सेवेमुळे रुग्णांना तर मानसिक बळ मिळालं पण आम्हालाही त्यामुळं काम करण्याचं पाठबळ आणि प्रोत्साहन मिळालं. लॉकडाऊनच्या काळात बाकीचे नागरिक आपल्या कुटुंबियांसोबत असतांनाही आपण मात्र आपल्या कुटुंबापासून प्रसंगी क्वारंटाईन राहून कर्तव्य बजावले, असे श्री.टोपे यांनी नमूद केले आहे.श्री. टोपे यांनी पत्रात नमूद केले आहे की, अडचणीच्या काळात स्त्री नेहमीच कुटुंबाची ढाल बनून उभी राहते. तुम्ही सर्व भगिनीही राज्यावरच्या या संकटात ढाल बनला आहात. आपण केलेल्या कार्यासाठी महाराष्ट्रातील जनता आपली सदैव ऋणी राहील. महाराष्ट्रातील तमाम जनतेच्या वतीने आपले पुनश्च आभार व्यक्त, करत जागतिक महिला दिनाच्या शुभेच्छा देतो.

Post a Comment

please do not enter any spam link in the comment box

Previous Post Next Post
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी