क्षयरोग रुग्णांमध्ये लक्षणीय घटीसाठी महाराष्ट्राला एक सुवर्ण तर दोन कांस्यपदक -NNL


नवी दिल्ली|
क्षयरोग  रुग्णांमध्ये लक्षणीय घट घडवून आणणाऱ्या अहमदनगर जिल्ह्याला केंद्रीय आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयाचे  सुवर्ण पदक तर अकोला आणि बीड जिल्हयांना आज येथे कांस्यपदक  प्रदान करण्यात आले.

जागतिक क्षयरोग दिनानिमित्त केंद्रीय आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयाच्यावतीने येथील विज्ञान भवनात आयोजित “स्टेप अप टू एन्ड टीबी  2022” शिखर परिषदेत  क्षयरोग  रुग्णांमध्ये लक्षणीय घट घडवून आणणाऱ्या राज्य व जिल्ह्यांना सन्मानित करण्यात आले.यावेळी जिल्हा श्रेणीमध्ये महाराष्ट्रातील तीन जिल्ह्यांना सन्मानित करण्यात आले. वर्ष 2015 च्या तुलनेत वर्ष २०२१ पर्यंत  क्षयरोगाच्या रुग्णांमध्ये ६० टक्के  पेक्षा जास्त घट घडवून आणणाऱ्या अहमदनगर जिल्ह्याला  यावेळी  केंद्रीय आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्री डॉ. मनसुख मांडविया,राज्यमंत्री डॉ. भारती  पवार  यांच्या हस्ते सुवर्ण  पदक प्रदान करण्यात आले.अहमदनगर जिल्हा क्षयरोग केंद्राचे वैद्यकीय अधिकारी डॉ. भागवत दहीफळे यांनी हा पुरस्कार स्वीकारला. पदक, ५ लाख रुपये रोख आणि  प्रमाणपत्र असे या पुरस्काराचे स्वरूप आहे.  

या शिखर परिषदेच्या दुसऱ्या टप्प्यात केंद्रीय आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयाच्या  वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून जिल्हा श्रेणींच्या पुरस्कारांचे वितरण करण्यात आले.अकोला आणि बीड जिल्ह्यांना वर्ष 2015 च्या तुलनेत वर्ष २०२१ पर्यंत  क्षयरोगाच्या रुग्णांमध्ये २० टक्के  पेक्षा जास्त घट घडवून आणण्याच्या  कामगिरीसाठी  यावेळी कांस्यपदकाने गौरविण्यात आले. अकोल्याचे जिल्हा क्षयरोग अधिकारी डॉ.हरी पवार  आणि बीड जिल्हा क्षयरोग केंद्राच्या वैद्यकीय अधिकारी डॉ. मनिषा जाधव यांनी हा पुरस्कार स्वीकारला. पदक, २ लाख रुपये रोख आणि  प्रमाणपत्र असे या पुरस्काराचे स्वरूप आहे.

यावेळी उत्तर प्रदेशच्या राज्यपाल आनंदीबेन पटेल यांनी दूरदृश्यप्रणालीद्वारे तर केंद्रीयमंत्री डॉ. मनसुख मांडविया,डॉ. भारती  पवार यांच्यासह विज्ञान-तंत्रज्ञान आणि पृथ्वी विज्ञान राज्यमंत्री (स्वतंत्र प्रभार)  डॉ. जितेंद्र सिंह आणि निती आयोगाचे सदस्य डॉ. व्ही.के.पॉल यांनी  विज्ञानभवनात उपस्थितांना संबोधित केले. 

Post a Comment

please do not enter any spam link in the comment box

Previous Post Next Post
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी