नांदेडच्या राष्ट्रध्वज निर्मिती केंद्रासाठी २५ कोटी -NNL

स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षात महत्त्वपूर्ण निर्णय 


मुंबई|
राष्ट्रध्वजाची निर्मिती करणाऱ्या देशभरातील निवडक केंद्रांमध्ये समावेश असलेली नांदेड येथील ऐतिहासिक संस्था मराठवाडा खादी ग्रामोद्योग समितीच्या वास्तुचा कायापालट करण्यासाठी राज्याच्या अर्थसंकल्पात २५ कोटी रूपये प्रस्तावीत करण्यात आले आहेत. 

राज्याच्या अर्थसंकल्पात आज झालेल्या या घोषणेचे सार्वजनिक बांधकाम मंत्री तथा नांदेडचे  पालकमंत्री अशोक चव्हाण यांनी स्वागत केले आहे. चव्हाण यांनी १६ ऑगस्ट २०२१ रोजी या संस्थेला भेट देऊन पाहणी केली होती. नवी दिल्लीचा लाल किल्ला, मुंबईचे मंत्रालय अशा देशभरातील अनेक महत्त्वाच्या शासकीय वास्तुंवर या संस्थेने तयार केलेले राष्ट्रध्वज फडकवले जातात. संस्थेची पाहणी केल्यानंतर चव्हाण यांनी सार्वजनिक बांधकाम विभागाच्या माध्यमातून या संस्थेची वास्तू व परिसराचा कायाकल्प करण्यासाठी आराखडा तयार करून घेतला. नवीन आराखड्यात कार्यालयीन इमारत, निर्मिती केंद्र, विक्री केंद्र आदींचा समावेश असून, या ठिकाणी खादीचे महत्त्व सांगणारे कायमस्वरूपी प्रदर्शन देखील उभारले जाणार आहे. हे केंद्र एक शैक्षणिक पर्यटन स्थळ म्हणून विकसित करण्याचे नियोजन करण्यात आले आहे. 

स्वातंत्र्य सेनानी स्वामी रामानंद तीर्थ, पद्मभूषण गोविंदभाई श्रॉफ यांनी १९६७ मध्ये स्थापन केलेल्या व त्यानंतर डॉ. शंकरराव चव्हाण यांनी संगोपन केलेल्या या संस्थेचा कायापालट करण्याच्या निर्णयाबद्दल नांदेडचे पालकमंत्री अशोक चव्हाण यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे व उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे आभार मानले. मराठवाडा खादी ग्रामोद्योग समितीचे हे केंद्र केवळ खादी उत्पादनांचे निर्मिती केंद्र न राहता पुढील पिढ्यांना प्रेरणा देणारे स्थळ म्हणून नावारूपास यावे, असाच आमचा प्रयत्न राहणार असल्याचे चव्हाण पुढे म्हणाले. या निर्णयानंतर त्यांनी संस्थेचे अध्यक्ष ईश्वरराव भोसीकर यांना दूरध्वनी करून त्यांचे अभिनंदन केले.

Post a Comment

please do not enter any spam link in the comment box

Previous Post Next Post
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी