बाळाचा मानसिक व धार्मिक विकास हा गर्भातच सुरु होतो - संगीताताई दमकोंडवार -NNL


मुखेड, दादाराव आगलावे।
गर्भसंस्कार यामध्ये गर्भ म्हणजे बाळ व संस्कार म्हणजे त्या बालावरील संस्कार असा त्याचा अर्थ आहे. गर्भावस्थे दरम्यान बाळाला चांगल्या गोष्टी शिकवणे व सकारात्मक विचार व नैतिक मुल्य गर्भावर रुजवणे म्हणजेच गर्भसंस्कार होय. जसं बाळाचं शरीर निरोगी व सुदृढ राहवं म्हणून ते प्रयत्न करतात अगदी तसंच ते बाळावर गर्भातच संस्कार करण्यासाठीही प्रयत्न करतात. भारतीय संस्कृतीत अनेक चालीरितींचे पालन केले जाते त्यापैकीच गर्भसंस्कार ही देखील एक महत्त्वाची पद्धत आहे. बाळाचा मानसिक व धार्मिक विकास हा गर्भातच सुरु होतो असे प्रतिपादन नांदेड येथील सेवेकरी संगीताताई दमकोंडवार यांनी केले.

आखील भारतीय श्री स्वामी समर्थ सेवा केंद्र मुखेड येथे गर्भसंस्कार पालकत्व शिबीराचे आयोजित करण्यात आले होते यावेळी संगीताताई भक्तांना संबोधीत करत होत्या. त्या पुढे म्हणाल्या की, बाळावर चांगले संस्कार करण्याची सुरुवात ही गर्भापासूनच होते. प्रत्येक आई-वडिलांचेच आपल्या मुलाचा चांगला सांभाळ करण्यासोबतच चांगले संस्कार करण्याचे स्वप्न असते. 

नांदेड येथील सेवेकरी सौ. पांचाळ बालसंस्कारावर बोलताना म्हणाल्या की, लहान बाळ येणार असलं की त्याची तयारी घरातील प्रत्येकजण आपापल्या परीने करु लागतो. मग त्या नव्या पाहुण्याचे स्वागत कसे करायचे? त्याला कम्फर्टेबल वाटेल अशी घरातील जागा कोणती? त्याचं नाव काय ठेवायचं? त्याच्यासाठी शॉपिंग काय करायची? याविषयी घरातील सर्वजण उत्सुक असतात. तर आई-वडिलांचा आनंद तर या काळात गगनी मावत नसतो. बाळ येणार हा आनंद एका बाजूला आणि येणा-या बाळाला एक चांगली व्यक्ती म्हणून घडवण्याच्या जबाबदारीचा ताण एका बाजूला अशा द्विधा मनस्थितीतून पालक जात असतात. 


पारंपारिक मान्यतांनुसार बाळाचा मानसिक व धार्मिक विकास हा गर्भातच सुरु होतो आणि याच काळात त्याची पर्सनॅलिटी देखील विकसित होते. खूप पूर्वीपासूनच विज्ञानाने देखील ही गोष्ट मान्य केली आहे. रिसर्च अनुसार विचार केला तर बाळाच्या ५०% मेंदूचा विकास हा गर्भामध्येच होतो. भारतीय संस्कृती नुसार गर्भात असल्यापासूनच बाळाला चांगले शिक्षण देणे गरजेचे आहे. महाभारतामध्ये अर्जूनाचा मुलगा अभिमन्यूने देखील आईच्या गर्भातच युद्धाची रणनीती शिकण्यास सुरुवात केली होती. 

कार्यक्रमाचे प्रास्ताविक करताना मुखेड येथील सेवेकरी व्यंकटेश कवटीकवार म्हणाले की, मुखेड येथील केंद्रात अनेक समाज उपयोगी विविध उपक्रम राबविले जातात. मुखेड व तालुक्यातील अनेक गावात बालसंस्कार वर्ग घेऊन मुलांना चांगल्या प्रकारे संस्कार करण्यात येत आहे. याचाच भाग म्हणून गर्भसंस्कार पालकत्व शिबीर आयोजित करण्यात आले. या कार्यक्रमात ऋषी मुनींनी संशोधनातून आपल्या साठी ठेवलेले ज्ञानाची शिदोरी व पालकत्व स्विकारत असताना पती व पत्नी यांनी घ्यावयाची काळजी या सर्व प्रकारच्या प्रश्नांची उत्तरे, योग्य गर्भधारणा या बद्दल सखोल मार्गदर्शन मिळणार आहे.

या कार्यक्रमात महीला दिनानिमित्त समाजातील उच्च पदावर  समाज कार्य करणारे महिलांचा सन्मान करण्यात आला व महिला दिनाचे औचित्य साधून स्त्री रोग तज्ञ डॉ रमेश जाधव, नांदेड यांनी सविस्तर मार्गदर्शन केले व  २५७ महीलांची मोफत तपासणी केली.  कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. डॉ.चंद्रकांत एकलारे यांनी केले. कार्यक्रमास जिल्ह्यातील नांदेड, नायगाव, बिलोली, देगलूर, कंधार, धर्माबाद येथील सेवेकऱ्यांनी लाभ घेतला. यावेळी मुखेड येथील सेवेकऱ्यांनी अथक परीवर्तन केले.

Post a Comment

please do not enter any spam link in the comment box

Previous Post Next Post
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी