नांदेड| शिलाई मशीन, ब्युटीपार्लर, फॅशन डिझायनिंग प्रशिक्षण हे महिलांच्या प्रगतीची दिशा ठरेल, असे प्रतिपादन महिला व बाल विकास विभागाच्या उप मुख्य कार्यकारी अधिकारी रेखा कदम यांनी केले.
जिल्हा परिषदेच्या महिला व बाल विकास विभागातंर्गत अनुसूचित जाती व अनुसूचित जमाती घटकांतील महिलांना स्वयंसेवी संस्था अंतर्गत जिल्हयात कौशल्य विकास आणि स्वयंरोजगार निर्मितीसाठी प्रशिक्षण दिले जात आहे. मुदखेउ तालुक्यातील पाथरड येथे सुरू असलेल्या प्रशिक्षण शिबिरात नुकतीच उप मुख्य कार्यकारी अधिकारी रेखा कदम यांनी भेट देऊन प्रशिक्षणार्थ्यांशी संवाद साधला, त्यावेळी त्या बोलत होत्या. यावेळी गट विकास अधिकारी श्रीकांत बलते, बालविकास प्रकल्प अधिकारी राजुरे, सरपंच कैलास पाटील, उपसरपंच जयवंत थोरात, विस्तार अधिकारी कैलास गायकवाड, ग्रामसेवक सुनील वाघमारे, अर्पणा साळवे प्रशिक्षक भवरे मॅडम आदींची उपस्थिती होती.
पुढे त्या म्हणाल्या, अनुसूचित जाती व अनुसूचित जमाती घटकातील महीलांना स्वंचसिद्ध करण्यासाठी शासनाच्या वतीने कौशल्य विकास व रोजगाराचे प्रशिक्षण दिले जात आहे. या प्रशिक्षणाचा लाभार्थ्यांनी लाभ घ्यावा. योग्य पद्धतीने प्रशिक्षण घ्यावे. यातून उदरनिर्वाहाची साधने निर्माण होऊन महिलांच्या प्रगतीला नवी दिशा ठरेल, असे प्रतिपादन रेखा कदम यांनी केले. प्रशिक्षणास भेट देऊन त्यांनी समाधान व्यक्त केले.