किमान समान कार्यक्रमाची अंमलबजावणी करा-नाना पटोले -NNL

काँग्रेस प्रदेशाध्यक्षांचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र


मुंबई|
राज्यात काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस व शिवसेना पक्षाने एकत्र येऊन महाविकास आघाडी सरकार स्थापन करताना किमान समान कार्यक्रमाच्या (CMP)आधारे हे सरकार चालवण्याचे ठरले होते. कोरोना संकटामुळे त्याची अंमलबजावणी करण्यात अडथळा आला होता परंतु आता परिस्थिती पूर्वपदावर येत असल्याने किमान समान कार्यक्रमाची अंमलबजावणी करावी, अशी मागणी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष नाना पटोले यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र पाठवून केली आहे.

मुख्यमंत्र्यांना लिहिलेल्या पत्रात नाना पटोले म्हणतात, जातीयवादी शक्तींना सत्तेत येण्यापासून रोखण्यासाठी आणि समाजातील सर्व घटकांचा सर्वांगिण विकास साधण्याच्या हेतूने २०१९ साली तीन पक्ष एकत्र आले. अखिल भारतीय काँग्रेस कमिटीच्या अध्यक्षा मा. सोनियाजी गांधी यांच्या सुचनेनुसार किमान समान कार्यक्रमाच्या आधारे हे सरकार चालेल असे ठरलेले आहे. राज्यातील सर्व समाज घटकांना न्याय देण्याची काँग्रेस पक्षाची भूमिका राहिलेली आहे. सोनियाजी गांधी यांनी दलित, ओबीसी, आणि अल्पसंख्याक समाजाच्या कल्याणा साठीच्या योजनांवर सरकारने काम करावे यासाठी मुख्यमंत्र्यांना याआधीही पत्र पाठवले होते. कोरोनामुळे राज्य सरकारपुढे अडचणी होत्या पण या कठीण प्रसंगीही मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली मविआ सरकारने चांगले काम केले आहे. आता सर्व व्यवहार सुरुळीत सुरु असून अर्थव्यवस्थाही रुळावर आलेली आहे. आता सीएमपी व दलित, ओबीसी अल्पसंख्याक समाजाच्या कल्याणकारी योजनांची अंमलबाजवाणी करण्याची कार्यवाही लवकरात लवकर करावी.

पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना नाना पटोले म्हणाले की, महाविकास आघाडी सरकार स्थिर आहे, सरकारला कोणताही धोका नाही. नाराजीच्या काही बातम्या येत आहेत त्यात काही तथ्य नाही आघाडी सरकारमध्ये असे प्रकार होत असतात त्यात नवे काही नाही. शिवसेना व भाजपाचे सरकार असतानाही सर्व काही आलबेल होते का? हे सरकार तीन पक्षाचे आहे, काही मुद्द्यांवर आमदारांनी किंवा नेत्यानी वरिष्ठ नेत्याची भेट घेण्याची इच्छा व्यक्त केली असेल तर त्यात काही गैर नाही. भाजपाकडून आमदार नाराज असल्याच्या अफवा पसरवल्या जात आहेत.

Post a Comment

please do not enter any spam link in the comment box

Previous Post Next Post
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी