दारू बंद न केल्यास १ मे २०२२ रोजी धरणे आंदोलन करण्याचा इशारा
किनवट| तालुक्यातील मौजे चिखली बु येथील रसायनमिश्रीत अवैध दारू विक्री विरोधात स्थानिक प्रशासन तसेच वरिष्ठ पोलीस अधिकार्यांना शेकडो वेळा लेखी निवेदने विनंती अर्ज करून सुद्धा कारवाई होत नसल्याने वैतागलेल्या चिखली, बुधवारपेठ व मलकवाडी येथील शेकडो महिला तसेच पुरुषांनी आज किनवट पोलीस ठाणे व राज्य उत्पादन शुल्क कार्यालयात ठिय्या आंदोलन करत दारूविक्री कायम स्वरूपी बंद करण्याची मागणी केली. या मागणीसाठी महिला आक्रमक झाल्यानंतर उद्या 31 मार्च रोजी बुधवारपेठ येथे तीनही गावाची बैठक घेऊन दारू विक्रेत्यांवर कठोर कारवाई करण्याचे आश्वासन देण्यात आल्याने महिला शांत झाल्या.
किनवट तालुक्यातील मौजे चिखली बु येथे मागील कित्येक दिवसापासून रसायनमिश्रीत देशी दारू विक्री सुरू असून गावातील जवळपास आठ ते दहा जन अवैध देशी दारूची बिनदिक्कतपणे विक्री करत आहेत. दारू विक्रीमुळे चिखली, बुधवारपेठ तसेच मलकवाडी येथे नेहमीच भांडण तंट्याचे प्रसंग उद्भवून कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होत आहे अनेक गोरगरीब तरुण दारूच्या आहारी जात असून अनेकांचे संसार उघड्यावर आले आहेत येथील दारू विक्री कायमची बंद करावी यासाठी मागील दोन वर्षांपासून पोलिस राज्य उत्पादन शुल्क तसेच महसूल प्रशासनाकडे लेखी निवेदने सादर करण्यात येत आहेत.
वरिष्ठ अधिकार्याकडून चौकशी करण्याचे व कारवाई करण्याचे पत्र देण्यात येत असले तरी स्थानिक प्रशासन दारू विक्रेत्यांवर कारवाई करण्यास टाळाटाळ करत असल्याने आज चिखली बुधवारपेठ व मलकवाडी येथील शेकडो महिला व पुरुषांनी येथील पोलीस स्टेशन तसेच राज्य उत्पादन शुल्क कार्यालयात एल्गार केला. दुपारी बारा वाजताच्या सुमारास किनवट पोलीस ठाण्यात ठिय्या करत आक्रमक भूमिका घेतली व दारू विक्री तात्काळ बंद न झाल्यास 1 मे 2022रोजी धरणे आंदोलन करण्याचे निवेदन सादर केले.
दरम्यान महिला व पुरुषांनी घेतलेल्या आक्रमक पवित्र्यामुळे काही वेळ तारांबळ उडाली तर 31 मार्च रोजी बुधवारपेठ येथे तीनही गावातील महिला तसेच पुरुष यांची बैठक घेऊन अवैध दारू विक्री त्यावर कठोर कारवाई करण्याचे आश्वासन देण्यात आल्याने महिला शांत झाल्या. यावेळी बुधवारपेठे येथील तंटामुक्ती समितीचे अध्यक्ष वसंत कुडमते, चिखलीचे उपसरपंच शेख अमन, मलकवाडी येथील युवानेते बालाजी बामणे, भाजपा तालुकाध्यक्ष संदीप केंद्रे माजी सरपंच ज्ञानदेव पुरके, सरपंच गोविंद धुर्वे,काँग्रेस नेते नारायण सिडाम, सरपंच जगू मडावी सूर्यभान कुडमते, रामू कुडमते, प्रभू कुडमते, शेख युसूफ भाई, शेख सलीम, शिवा पवार,सुगंधाबाई कुडमते, विजया कुडमते, रुक्मिणीबाई मडावी, जनाबाई इंगळे, अनुसायाबाई दडणजे, रेणुकाबाई दडणजे, विनाबाई दडणजे यांच्यासह शेकडो महिला व पुरुष उपस्थित होते.