नांदेड जिल्हा परिषदेचा नरहर कुरुंदकर पुरस्कार देवीदास फुलारी यांना -NNL

सावित्रीबाई फुले पुरस्कार डॉ.भारती दगु मढवई यांना घोषित

नांदेड। नांदेड जिल्हा परिषदेच्या वतीने साहित्य क्षेत्रात उल्लेखनीय काम करणाऱ्या लेखक कवींना प्रतिवर्षी नरहर कुरुंदकर पुरस्काराने तर महिलांसाठी उत्कृष्ट काम करणाऱ्या व्यक्तीस सावित्रीबाई फुले पुरस्काराने सन्मानित करण्यात येते. सन 2020-21  चा नरहर कुरूंदकर पुरस्कार नांदेड जिल्ह्यातील लेखक कवी देविदास फुलारी यांना जाहीर झाला आहे. तर सावित्रीबाई फुले पुरस्कार डॉ. भारती मढवई यांना जाहीर करण्यात आला आहे.

नांदेड जिल्हा परिषदेचे शिक्षण सभापती संजय बेळगे यांनी आज पत्रकार परिषदेत या पुरस्कारांची घोषणा केली. यावेळी प्राथमिक शिक्षणाधिकारी सविता बिरगे यांची प्रमुख उपस्थिती होती. त्यांनी पत्रकार परिषदेत या कार्यक्रमाची भूमिका विशद केली. त्यानंतर शिक्षण सभापती संजय बेळगे यांनी नरहर कुरुंदकर पुरस्कार सावित्रीबाई फुले पुरस्कार आणि उत्कृष्ट शिक्षक पुरस्काराची घोषणा केली.

 देवीदास फुलारी यांचे 13 पुस्तके प्रकाशित झालेली असून पाच आऱ्यांचे चाक, अक्षर नारायणी, वेधांच्या प्रदेशात, कविता क्रांतीच्या, दूधावरची साय, देश जोडण्याचा खेळ, वसंत डोह, फुलपाखरांचा गाव ही पुस्तकं त्यांची गाजलेली आहेत. त्यांना अनेक सन्मान प्राप्त झाले आहेत. एक उत्तम वक्ता आणि साहित्याचे भाष्यकार म्हणून ते सर्व परिचित आहेत.

सावित्रीबाई फुले पुरस्कार प्राप्त डॉ. भारती दगु मढवई या वैद्यकीय व्यवसायात असून सामाजिक परिप्रेक्षात त्यांचे काम आहे. अनेक नाटकांमध्ये त्यांनी सावित्री, जिजाऊ, रमाई, अहिल्याबाई, झलकारीबाई यांच्या भूमिका केलेल्या आहेत. यांचे एकपात्री प्रयोग प्रसिद्ध आहेत. नरहर कुरुंदकर पुरस्कार आणि सावित्रीबाई फुले  पुरस्काराची रक्कम प्रति पुरस्कार रुपये दोन लाख रुपये रोख व सन्मानचिन्ह असे आहे.

 उत्कृष्ट शिक्षक पुरस्कार - उत्कृष्ट शिक्षक पुरस्कारासाठी 2019 -20 मध्ये प्राथमिक विभागातून 16, माध्यमिक विभागातून 11 विशेष शिक्षक 1 आणि प्रायोजित पुरस्कार 7 असे एकूण 35 जणांना गौरविण्यात येणार आहे. 2020-21 या वर्षातील प्राथमिकसाठी 13, माध्यमिकसाठी 13, विशेष शिक्षक 1आणि प्रायोजित पुरस्कार 7 असे एकूण 35 जणांना गौरविण्यात येणार आहे. उत्कृष्ट शिक्षक पुरस्कार मिळालेल्या एकूण 69 जणांचा गौरव यावेळी करण्यात येणार आहे. मानपत्र व सन्मान चिन्ह असे या पुरस्काराचे स्वरूप आहे.

या सर्व पुरस्कारांचे वितरण दिनांक 27 फेब्रुवारी 2022 रोजी सकाळी 10 वाजता नांदेड येथील कुसुम सभागृह होणार आहे. या पुरस्कार वितरण सोहळ्यास साहित्यप्रेमी, सामाजिक कार्यकर्ते, नागरिक आणि शिक्षकांनी उपस्थित राहण्याचे आवाहन प्राथमिक शिक्षणाधिकारी सविता बिरगे यांनी केले आहे.

कार्यक्रम समन्वयासाठी विविध समित्यांची स्थापना करण्यात आली असून प्राथमिक शिक्षणाधिकारी सविता बिरगे, माध्यमिक शिक्षणाधिकारी प्रशांत दिग्रसकर, उपशिक्षणाधिकारी दत्तात्रय मठपती, दिलीप बनसोडे, बंडू आमदूरकर, बळीराम येरपूलवार, योगेश परळीकर, कक्षाधिकारी गोटमवाड, डॉ. विलास ढवळे आदींचा समावेश आहे.

Post a Comment

please do not enter any spam link in the comment box

Previous Post Next Post
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी