द्वेष निर्माण करणाऱ्या परंपरांचा त्याग करावा - डॉ. राजेंद्र गोणारकर -NNL

जवळ्यात माघ पौर्णिमा व रमाई जयंती उत्साहात ; धम्मदान व धम्मसंदेश यात्रेचे जोरदार स्वागत


नांदेड|
अनादिकालापासून माणसांत सांस्कृतिक संघर्ष चालत आलेला आहे. त्यामुळे आजही माणसाला माणूसपण नाकारणाऱ्या परंपरांचे आपण पालन करतो. हे देशभरात आदिवासी, दलित आणि स्त्रियांच्या बाबतीत घडते. स्त्रियांना माणूस म्हणून मान सन्मान आणि अधिकारांचा वापर करु द्यायचा असेल तर स्रीचे स्वतंत्र अस्तित्व मान्य होईल. महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि माता रमाईचा आदर्श घेऊन जगत असतांना द्वेष निर्माण करणाऱ्या परंपरांचा आपण त्याग केला पाहिजे असे प्रतिपादन येथील स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाच्या माध्यमशास्र संकुलाचे प्रा. डॉ. राजेंद्र गोणारकर यांनी जवळा येथे केले. 

ते माघ पौर्णिमा व रमाई जयंतीनिमित्त घेण्यात आलेल्या कार्यक्रमात बोलत होते. यावेळी भदंत पंय्याबोधी थेरो आणि श्रामणेर भिक्खू संघ, भंते धम्मपाल, समाज कल्याण अधिकारी अशोक गोडबोले, रिपाइंचे जिल्हाध्यक्ष भगवान ढगे, विपश्यनाचार्य गौतम भावे, माजी मनपा उपायुक्त प्रकाश येवले, आंबेडकरी चळवळीतील कार्यकर्ते राज गोडबोले, डॉ. चंद्रशेखर एंगडे, साहित्यिक प्रज्ञाधर ढवळे, माजी सरपंच कैलास गोडबोले आदींची प्रमुख उपस्थिती होती. 

माघ पौर्णिमा व माता रमाई यांच्या १२४ व्या जयंती सोहळ्याचे आयोजन जवळा देशमुख येथील विश्वशांती बुद्ध विहारात करण्यात आले होते. यावेळी डॉ. गोणारकर म्हणाले की, स्त्रियांना त्यांचे हक्क आणि अधिकार मिळवून देण्यासाठी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी अहोरात्र कष्ट घेतले. त्यांच्या एकूणच कार्यात रमाईची प्रचंड साथ होती. त्यामुळे आज आंबेडकरी अनुयायी म्हणून माणसा माणसांत द्वेष निर्माण करणाऱ्या परंपरा आपण नाकारल्या पाहिजेत.  

प्रेम, करुणा, समता, न्याय, स्वातंत्र्य, बंधुभाव निर्माण करणाऱ्या धम्म परंपरांचा स्विकार केला पाहिजे असेही ते म्हणाले. प्रारंभी तालुक्यातील खुरगाव नांदुसा परिसरातील श्रामणेर प्रशिक्षण केंद्राच्या धम्मदान व धम्मसंदेश यात्रेचे जोरदार स्वागत करण्यात आले. आकाशवाणीचे प्रासंगिक निवेदक आनंद गोडबोले यांच्या परिवाराकडून भिक्खू संघाला भोजनदान देण्यात आले. त्यानंतर तथागत गौतम बुद्ध, डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि माता रमाई यांच्या प्रतिमांचे मान्यवरांच्या हस्ते पूजन करण्यात आले. त्यानंतर डॉ. राजेंद्र गोणारकर यांचे व्याख्यान आणि भदंत पंय्याबोधी थेरो यांची धम्मदेसना संपन्न झाली. 

तिसऱ्या सत्रात विपश्यनाचार्य गौतम भावे यांनी आनापान सती ध्यान साधना कार्यक्रम घेतला. त्यानंतर रमाई विचार मंच आणि प्रगती स्वयंसहाय्यता महिला बचत गटाच्या वतीने मान्यवरांच्या हस्ते सन २०२२ च्या रमाई गणगोत पुरस्कारांचे वितरण करण्यात आले. त्यात रत्नमाला गौतम भावे, तारामती आऊलवार, रोहिणी एंगडे, सूर्यकांता धोत्रे, कांताबाई मस्के, सोनाबाई सोनकांबळे आणि मायाबाई गोडबोले यांचा समावेश होता. भिक्खू संघाला आर्थिक दान दिल्यानंतर आशिर्वाद गाथेने कार्यक्रमाची सांगता करण्यात आली. उपस्थित बौद्ध उपासक उपासिकांना आनंद गोडबोले यांच्या परिवाराकडून भोजनदान देण्यात आले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक स्तंभलेखक भैय्यासाहेब गोडबोले यांनी केले. 

सूत्रसंचालन प्रज्ञाधर ढवळे यांनी तर आभार आनंद गोडबोले यांनी मानले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी जवळा येथील रमाई विचार मंच आणि प्रगती स्वयंसहाय्यता महिला बचत गटाच्या रुक्मिणीबाई गोडबोले, गिरजाबाई गोडबोले, सुंदरबाई गोडबोले, वैशाली गोडबोले, संगिता गोडबोले, मिनाक्षी गोडबोले, आकांक्षा गोडबोले, प्रियंका गोडबोले, छाया गोडबोले, विद्या गोडबोले, शितल गोडबोले,पांडूरंग गोडबोले, रावण गोडबोले, पुरभाजी गोडबोले, रमेश गोडबोले, कैलास गोडबोले, विलास गोडबोले, आनंद गोडबोले, मिलिंद गोडबोले, विनोद गोडबोले, वैभव गोडबोले, विशाल गोडबोले यांच्या सह जवळा येथील सर्व उपासक, उपासिका व युवा मित्र मंडळाने परिश्रम घेतले.

संकटकाळात संयम राखणे आवश्यक - भदंत पंय्याबोधी थेरो

धम्मदेसना देत असताना धम्मगुरू भदंत पंय्याबोधी थेरो म्हणाले की, माणसाच्या जीवनात अनेक संकटे येतात. कधी कधी संकटं एकामागून एक येत असतात. त्यांचा मुकाबला धैर्याने केला पाहिजे. ही शक्ती मानवात धम्माचरण केल्याने निर्माण होते. धम्म समजून घेतला आणि सचोटीने अंगिकारला तर तो खूप बलवान असल्याचे आपणास प्रतित होईल. यामुळे दरेक व्यक्ती वैचारिक तसेच सामाजिकदृष्ट्या  बलवान होतो. असा समाज सांस्कृतिकदृष्ट्या बलशाली होतो. हे याचे फलित आहे.

Post a Comment

please do not enter any spam link in the comment box

Previous Post Next Post
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी