‘लडकी हूँ, लड सकती हूँ’ अभियानाला १२५ दिवस झाल्यानिमित्ताने महिला काँग्रेसची रॅली
मुंबई| काँग्रेस सरचिटणीस प्रियंकाजी गांधी यांनी ‘लडकी हूँ, लड सकती हूँ’, या अभियानातून महिला सक्षमीकरणाला बळ दिले आहे. प्रियंकाजी या दुसऱ्या इंदिराजी गांधीच आहेत. उत्तर प्रदेशातून सुरु झालेले हे आंदोलन देशभरातील महिलांना त्यांच्या न्याय हक्काची जाणीव करून देणारे असून राज्यातही हे अभियान सगळीकडे राबवू, असे महिला व बाल कल्याण मंत्री ऍड. यशोमती ठाकूर यांनी म्हटले आहे.
‘लडकी हूँ, लड सकती हूँ’ या अभियानाला १२५ दिवस पूर्ण झाल्याच्या निमित्ताने महाराष्ट्र प्रदेश महिला काँग्रेसच्या वतीने पुण्यात महिला रॅलीचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमात महिला काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षा संध्याताई सव्वालाखे, काँग्रेस शहराध्यक्ष तथा माजी मंत्री रमेश बागवे, आमदार संग्रामदादा थोपटे, कमल व्यवहारे, दीप्तीताई चवधरी, मनीष आनंद, संगीता धोंडे, संगीता तिवारी, निता त्रिवेदी, रुपाली कापसे, डॉ अंजली ठाकरे, उज्वला साळवे, पूनम पाटील, जयश्री वानखेडे, सूर्यशिला मोरे, पुणे महिला काँग्रेसच्या अध्यक्षा पूजा आनंद आदी उपस्थित होते.
प्रियंकाजी गांधी यांनी दिलेला ‘लडकी हूं’ लड सकती हूं’, हा नाऱ्यातून मुलींची शक्ती, मुलींचा सन्मान, तसेच मुली आणि स्त्रिया आपल्या अधिकारासाठी लढू शकतात हा संदेश दिला आहे. अखिल भारतीय महिला काँग्रेसच्या अध्यक्ष नेटा डिसुझा यांच्या सूचनेनुसार सर्व महिला आणि मुली गुलाबी टीशर्ट, गुलाबी साडी परिधान करून ह्या रॅलीत सहभागी झाल्या होत्या, हातात गुलाबी फुगे घेऊन मुली, विद्यार्थिनी, महिलांनी रॅलीत सहभाग घेतला.यावेळी बोलताना महिला काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षा संध्याताई सव्वालाखे म्हणाल्या, पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजपा नेते महिलांबाबत खालच्या पातळीची भाषा वापरतात. महिलांनी अन्यायाविरुध्द लढले पाहिजे. आमदार संग्रामदादा थोपटे आणि पुणे शहराध्यक्ष रमेशदादा बागवे यांनीही यावेळी मार्गदर्शन केले. या कार्यक्रमाचे सूत्रसंचलन MPMCC उपाध्यक्ष संगीता तिवारी यांनी केले.