भारतीय विद्या भवन,इन्फोसिस फाऊंडेशनच्या सांस्कृतिक प्रसार कार्यक्रमांतर्गत आयोजन
पुणे। भारतीय विद्या भवन आणि इन्फोसिस फाऊंडेशनच्या सांस्कृतिक प्रसार कार्यक्रमांतर्गत 'जागर स्त्रीशक्तीचा ' या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाला चांगला प्रतिसाद मिळाला .
शनीवार, दि. १९ फेब्रुवारी २०२२ रोजी सायंकाळी ६ वाजता भारतीय विद्या भवनचे सरदार महादेव बळवंत नातू सभागृह,(सेनापती बापट रस्ता) येथे हा कार्यक्रम झाला. या कार्यक्रमांत शास्त्रीय बंदिशी, नाटयगीत, अभंग, गवळण यांचे बहारदार सादरीकरण झाले. किशोरी जानोरीकर, डॉ.रेवा नातू यांनी सुश्राव्य गायन करुन रसिकांची मने जिंकली.
त्यांना प्रणव गुरव ( तबला ),लीलाधर चक्रदेव( हार्मोनियम ),गौरी दैठणकर (ताल वाद्य ) यांनी साथ संगत केली. मधुलिका बोधले यांनी निवेदन केले.भारतीय विद्या भवनचे मानद सचिव प्रा.नंदकुमार काकिर्डे यांनी प्रास्ताविक केले.
हा कार्यक्रम विनामूल्य होता.‘भारतीय विद्या भवन’ आणि ‘इन्फोसिस फाऊंडेशन’च्या सांस्कृतिक प्रसार कार्यक्रमांतर्गत सादर होणारा हा ११० वा कार्यक्रम होता. अंबिका रागातील ' जय कालिके ' या बंदीशने डॉ.रेवा नातू यांनी सुरवातीला सादर केली.किशोरी जानोरीकर यांनी मालकंस रागातील सरस्वती पूजनाची बंदीश सादर केली. ' तारिणी नव वसनधारिणी ' अशा नाटयपदांनी रसिकांची मने जिंकली.
'जय दुर्गे दुर्गती परिहारिणी ' हे भावगीत, 'कसा तुज आवडला गं हरी ' ही गवळण, ' जय अंबे जोगाई माई ' हे पद, 'भाग्यदा लक्ष्मी बारम्मा ', 'पतीत तू पावना ' अशी एकाहून एक बहारदार सादरीकरणे या कार्यक्रमात झाली.