नांदेड| अखिल भारतीय क्षत्रिय राजपूत महासभेच्या महिला प्रदेशाध्यक्षा तथा भाजपा महिला मोर्चा जिल्हा उपाध्यक्षा सुषमा ठाकूर यांना जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा मंगाराणी अंबुलगेकर व महापौर जयश्री पावडे यांच्या हस्ते जिजाऊ सावित्री रत्न पुरस्कार देऊन गौरवण्यात आले.
जिजाऊ सावित्री जयंती महोत्सवानिमित्त दैनिक युवाराज्य व आझाद ग्रुप च्या वतीने गणराज सभागृहात झालेल्या कार्यक्रमाच्या वेळी बालरोग तज्ज्ञ डॉ. हंसराज वैद्य , ज्येष्ठ सहित्यिक देविदास फुलारी, धर्मभूषण ॲड. दिलीप ठाकूर यांच्यासह अनेक मान्यवरांची उपस्थिती होती. कार्यक्रमाच्या सुरुवातीला संयोजक प्रा. गणेश शिंदे यांनी पुरस्कार देण्यामागची भूमिका स्पष्ट करतांना सुषमा ठाकूर यांनी कोरोना लॉकडाऊनच्या काळात आपल्या शेतातील पिकलेला 25 क्विंटल गहू गरजूंना वाटप केला होता.
घरकाम करणाऱ्या श्रमिक महिलांना संक्रांतीचे वाण म्हणून ब्लँकेट वाटप तसेच सफाई कामगारांना महाराणा प्रताप जयंती निमित्त छत्री वाटप यासारखे अनेक समाजोपयोगी उपक्रम घेतले आहेत. अनेक महिलांच्या प्रश्नावर त्यांनी वाचा फोडली असल्यामुळे पुरस्कारासाठी त्यांची निवड करण्यात आल्याचे सांगितले. सुषमा ठाकूर यांच्यासह त्यांचे पती नरसिंह ठाकूर व मुलगा धनराजसिंह यांना स्मृतिचिन्ह व पुस्तक भेट देऊन सन्मान करण्यात आला.
यावेळी सुषमा ठाकूर यांचे अभिनंदन करण्यासाठी वसंतराव देशमुख, हुकुमसिंह ठाकूर, अनुराधा गिराम, नंदा चव्हाण ,जयश्री ठाकूर, मीरा सूर्यवंशी, कांचन ठाकूर ,सुनिता चव्हाण, अनिता ठाकूर, शितल चव्हाण यांच्यासह अनेक जण आवर्जून उपस्थित होते. आपल्याला मिळालेल्या पुरस्कारामुळे आणखी सामाजिक कार्य करण्याची ऊर्जा मिळाली असल्याचे सुषमा ठाकूर यांनी सत्काराला उत्तर देताना सांगितले. जिजाऊ सावित्री रत्न पुरस्कार मिळाल्याबद्दल सुषमा ठाकूर यांचे सर्व स्तरातून कौतुक होत आहे.