हिमायतनगर| महाशिवरात्री निमित्त आयोजित हिमायतनगर येथील परमेश्वर मंदिरातील धार्मिक कार्यक्रम प्रसंगी येणाऱ्या भाविकांनी कोरोना नियमनाचे पालन करून श्री परमेश्वराचे दर्शन घ्यावे असे आवाहन श्री परमेश्वर मंदिर ट्रस्टचे पदसिद्ध अध्यक्ष तथा तहसीलदार डी.एन. गायकवाड यांनी केले.
ते महाशिवरात्रीच्या पूर्व दिनी श्री परमेश्वर मंदिरास भेट देऊन नियोजन व भाविकांच्या साठी करण्यात आलेल्या सुविधेची पाहणी करण्यासाठी आले असता मंदिर कमिटीच्या सदस्यांसोबत चर्चेच्या वेळी बोलत होते. यावेळी सुरुवातील त्यांनी श्री परमेश्वरचे दर्शन घेतले. कोरोनामुळे दोन वर्षानंतर श्री परमेश्वराच्या अलंकार सोहळ्यातील श्रीमूर्तीचे कैलेंडर छापण्यात आले. प्रकाशित करण्यात आलेल्या श्री परमेश्वर मूर्तीच्या कैलेंडर तथा भिंतीपत्रकाचे विमोचन तहसीलदार यांचे हस्ते करण्यात आले.
त्यानंतर उद्या डी.०१ मार्च रोजी महाशिवरात्री असल्याने श्री परमेश्वर मूर्तीचा शासकीय पूजेने अलंकार सोहळा होणार असून, सदरील अलंकार पोलीस बंदोबस्तात केला जाणार आहे. त्या पार्श्वभूमीवर श्री परमेश्वर मंदिरात बैंकेच्या लॉकरमधील दागिने पोलीस बंदोबस्तात आणून पंचनामा करण्यात आला. यावेळी मंदिर कमिटीचे अध्यक्ष तहसीलदार डी.एन. गायकवाड, उपाध्यक्ष महावीरचंद श्रीश्रीमाळ, अनंता देवकते, माधव पाळजकर, लताताई मुलंगे, मथुराबाई भोयर, अनिल मादसवार, पोलीस जमादार नागरगोजे, बाबुराव भोयर, मुन्ना शिंदे, देवराव वाडेकर, शिवाजी रामदीनवार, बंडू हरडपकर, आदींसह अनेकांची उपस्थिती होती.
यावेळी महाविरचंद श्रीश्रीमाळ म्हणाले कि, मंदिर कमिटीने घेतलेल्या निर्णयानुसार केवळ शासकीय महापूजा अभिषेक तहसीलदार गायकवाड हे सपत्नीक करतील. त्या व्यतिरिक्त मंदिरात कोणताही अभिषेक सोहळा तसेच पूजा होणार नाही. याची भाविकांनी नोंद घ्यावी आणि कोरोना नियमाचे पालन करत सोशल डिस्टन्स ठेऊन, मास्क सैनिटायजरचा वापर करून सर्वानी रांगेत दर्शन घ्यावे आणि मंदिर कमिटी व प्रशासनाला सहकार्य करावे असे आवाहनही त्यांनी केले.