हडको मुख्य मार्गसाठी ना. चव्हाण यांच्याकडे पाठपुरावा करण्याची आ. हंबर्डे यांची ग्वाही -NNL


नवीन नांदेड।
सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोकराव चव्हाण यांच्या पुढाकाराने नांदेड शहरासह सिडको मुख्य मार्ग सार्वजनिक बांधकाम विभागाकडे वर्ग करून विकासकामाची सुरुवात करण्यात आली आहे. मात्र हडको मुख्य मार्ग सार्वजनिक विभागातून वगळण्यात आले आहे. दरम्यान सिडको प्रमाणे हडको मुख्य मार्गाचे काम देखील सार्वजनिक बांधकाम विभागामार्फत करण्यात यावे अशी मागणी नांदेड शहर जिल्हा काँग्रेस कमिटी सचिव बापूसाहेब पाटील यांनी निवेदनाद्वारे आ. मोहनराव हंबर्डे यांच्याकडे केली आहे. दरम्यान यासाठी आवश्यक तो पाठपुरावा पालकमंत्री अशोकराव चव्हाण यांच्याकडे करु अशी ग्वाही आ.मोहनराव हंबर्डे यांनी दिली आहे.  

सार्वजनिक बांधकाम मंत्री तथा पालकमंत्री ना. अशोकराव चव्हाण यांनी शहरातील मुख्य मार्गाचा समावेश सार्वजनिक बांधकाम विभागात करुन जवळपास ५५० कोटीचा निधी उपलब्ध करून दिला. यामुळे शहराचा चेहरा मोहरा बदलणार आहे. दरम्यान डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक (लातूर फाटा) ते श्री महाराणा प्रताप यांचे स्मारक ते सिडको मुख्य मार्ग ते साहित्य सम्राट अण्णाभाऊ साठे स्मारक ते ज्ञानेश्वर नगर मार्ग थेट हडको पाण्याची टाकी पर्यत सार्वजनिक बांधकाम विभागा अंतर्गत रस्त्याचे काम होणार आहे. 

मात्र हडको पाण्याची टाकी पासून वैद्यकीय महाविद्यालय ते छत्रपती शिवाजी महाराज पुतळा हडको ते इंदिरा गांधी हायस्कुल ते संत गोरोबा चौक ते अण्णाभाऊ साठे चौक हा मार्ग सार्वजनिक बांधकाम विभागातून तांत्रिक कारणाने वगळण्यात आला. या मार्गाचे काम नगररचना विभाग, मनपाच्या मार्फत होऊ शकते. सदर हडको मुख्य मार्गाचे काम सार्वजनिक बांधकाम विभागाकडूनच दर्जेदार व्हावे ही जनसामान्याची मागणी आहे. 

त्यामुळे सदर मार्ग सार्वजनिक बांधकाम विभागाकडे वर्ग करावा अशी मागणी शहर जिल्हा काँग्रेस कमिटी सचिव बापूसाहेब पाटील यांनी आ. मोहनराव हंबर्डे यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे. दरम्यान याकरिता पालकमंत्री अशोकराव चव्हाण यांच्याकडे पाठपुरावा करून सार्वजनिक बांधकाम विभागाच्या मार्फत काम करुन घेवू अशी ग्वाही आ. मोहनराव हंबर्डे यांनी दिल्याची माहिती, काँग्रेस कमिटी सचिव बापूसाहेब पाटील यांनी दिली आहे.

Post a Comment

please do not enter any spam link in the comment box

Previous Post Next Post
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी