हिमायतनगर शहरात छत्रपती शिवरायांना जयंतीनिमित्त अनेकांनी केला मुजरा
हिमायतनगर, अनिल मादसवार| आजच्या दिनी जगभरात अत्यंत उत्साहपूर्ण वातावरणात शिवजयंती साजरी केली जाते. छत्रपती शिवाजी महाराजांचे कार्य अजरामर आहे, देव, धर्म आणी देश, हिंदवी स्वराज्य, भारत देश, या देशाचे पवित्र, या देशाच्या सनातनी धर्माच्या परंपरा, या देशाचे लालित्य, पालित्य, शिवराज्य, स्वराज्य आणि रामराज्य टिकवून आहे. ते फक्त आणि फक्त शिवाजी रांजेच्यामुळे आहे. त्यांच्या कार्याबद्दल बोलण्याइतका मी विद्वान नाही. महाराजांच्या जयंती दिनी एवढेच सांगतो कि... जसे तहान लागल्यावर जेवढे पाणी महत्वाचे आहे... भूक लागल्यावर जेवढं अन्न महत्वाचे आहे... त्या आधी छत्रपती शिवाजी महाराजांचे आचरण या दिवशी आपण आत्मसात करून जगण्याचा संकल्प करणे आवश्यक आहे. मुख्यत्वे आजच्या तरुण पिढीने रयतेचे राजे छत्रपती शिवाजी महाराज यांचे विचार आचरणात आणावे तरच खऱ्या अर्थाने आपण जयंती साजरी केल्याचे सार्थक होईल. असे आवाहन भगवताचार्य हभप. महेंद्र महाराज मस्के यांनी उपस्थितांना केले.
हिमायतनगर येथे दि.१९ फेब्रुवारी रोजी सार्वजनिक छत्रपती शिवाजी राजे जयंती उत्सव समिती हिमायतनगर (वाढोणा) च्या पुढाकारातून श्री परमेश्वर मंदिरासमोरील मैदानात धुमधडाक्यात साजरी करण्यात आली याप्रसंगी ते बोलत होते. सकाळी ११ वाजता जय भवानी...जय शिवाजी... नामाचा जयघोषात करत अखंड हिंदुस्थानचे आराध्य दैवत, महाराष्ट्राची अस्मिता, रयतेचे राजे, रण धुरंधर, प्रौढ प्रताप पुरंदर, क्षत्रिय कुलावतं, सिंहासनाधीश्वर, महाराजाधिराज योगिराज श्रीमंत श्री श्री श्री छत्रपती शिवाजी महाराज यांचा जन्मोत्सव सोहळा शासनाने जारी केलेल्या कोरोना महामारीच्या सर्व नियमांचे पालन करून जिजाऊ वंदना घेतल्यानंतर पार पडला.
यावेळी माजी जी.प.सदस्य लक्ष्मण शक्करगे, पोलीस निरीक्षक भगवान कांबळे, डॉ गणेश कदम, हभप. मस्के महाराज यांच्या हस्ते छत्रपती शिवाजी राजेंच्या प्रतिमेचे पूजन पुष्पहाराने करण्यात आले. तर कृउबाचे माजी सभापती गजानन तुप्तेवार यांच्या हस्ते नारळ फोडून शिवजन्मोत्सव साजरा करण्यात आला. याप्रसंगी डॉ.शेषेराव चव्हाण, डॉ.दिलीप माने, डॉ.दिगंबर वानखेडे, डॉ.प्रसन्न रावते, डॉ आनंद माने, पांडुरंग तुप्तेवार, शंकर पाटील, सरदार खान यांची प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थिती होती. यावेळी जयंतीस्थळी अनेक मान्यवरांनी भेटी देऊन उपस्थित नागरिक व शिवभक्तांना छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीनिमित्त प्रतिमेस अभिवादन करून शुभेच्छा दिल्या.
यावेळी शहरासह ग्रामीण भागातील युवकांनी डोक्यावर फेटे, वाहनाला छत्रपतींची प्रतिमा असलेले भगवे ध्वज बांधून सहभागी झाले होते. शहरात लावण्यात आलेले भगवे झंडे, पताका छत्रपती शिवाजी महाराजांची प्रतिमेचे पूजन करून अभिवादन करण्यात आल्याने आजच्या शिवजयंती सोहळ्यामुळे शहरात सर्वत्र भगवेमय वातावरण निर्माण झाले होते. यावेळी नायब तहसीलदार अनिल तामस्कर, पोलीस उपनिरीक्षक नंदलाल चौधरी, बालाजी महाजन, जमादार सिंगणवाड, संजय माने, रामभाऊ ठाकरे, सत्यव्रत ढोले, फुलके महाराज, विठ्ठल ठाकरे, रामभाऊ नरवाडे, विलास वानखेडे, अनिल भोरे, गजानन चायल, आदींसह अनेकांची उपस्थिती होती. जन्मोत्सव सोहळा यशस्वी करण्यासाठी गोविंद शिंदे, रामभाऊ सूर्यवंशी, प्रशांत देवकते, मुन्ना शिंदे, गजानन हरडपकर आदींसह सार्वजनिक शिवजयंती मंडळाच्या सदस्यांनी परिश्रम घेतले. जयंती दरम्यान कोणताही अनुचित प्रकार घडू नये म्हणून पोलीस निरीक्षक भगवान कांबळे यांनी कर्मचाऱ्यांचा बंदोबस्त लावला होता.
शहरातील चौकाचौकात आणि घराघरात शिवजयंती - हिमायतनगर शहरातील प्रत्येक वॉर्डातील चौकाचौकात छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती मोठ्या हर्षोल्हासात साजरी करण्यात आली. प्रत्येक ठिकाणी शिवरायांच्या प्रतिमेचे पूजन करून मुजरा करण्यात आला. यावेळी जय भवानी.. जय शिवाजी... तुमचा आमच नातं काय जय जिजाऊ... जय शिवराय... अश्या नामघोष करण्यात आला. रयतेचे राजे छत्रपतींच्या प्रति असललेली युवकांच्या मनातील भावना जागृत व्हावी म्हणून सर्व युवा पिढीने शिवरायांचे विचार आचरणात आणावे. हा सोहळा सर्व स्तरातील नागरिकांनी घराघरात साजरा करायला हवा असा संदेश मान्यवरांनी दिला. तर अनेक बाळगोपाळांना आपल्या सायकलीस छत्रपती शिवरायांची प्रतिमा असलेला ध्वज बांधून छोटी रैली काढून जय भवानी जय शिवाजी... एकच राजा जाणता राजा... छत्रपती शिवाजी महाराजांचा जयजयकार असो... अश्या घोषणा दिल्या.