पोलिसांना चोरट्यांचा शोध लागेना; मोटर व इतर साहित्याच्या माध्यमातून झाली चोरी
हिमायतनगर,अनिल मादसवार| किनवट-नांदेड राष्ट्रीय महामार्गावरील हिमायतनगर शहरानजीक असलेल्या HPCL कंपनीच्या दवणे पेट्रोल पंपावरून मध्यरात्री १ ते २ वाजेच्या सुमारास चोरट्यांनी मोटर व इतर साहित्याच्या माध्यमातून चक्क डिझेलची चोरी केली आहे. एवढेच नाहीतर तर सीसीटीव्हीमध्ये आपण येऊ नये यासाठी चोंरट्यानी तेथील सीसीटीव्हीवर प्लॅस्टिकच्या जाड कपडा बांधून अंदाजे २ लक्ष ८६ हजार ९३४ रुपये किमतीचे ३ हजार लिटर डिझेल चोरीला गेल्याची फिर्याद संचालकाने पोलीस ठाण्यात दिली आहे.
हिमायतनगर शहर व परिसरात मागील काही महिन्यापासून चोरटयांनी धुमाकूळ घातला असून, घरफोड्या करून जखमी करणे, मंदिराची दानपेटीची चोरी, भुसार दुकानात चोरी, शाळा, सीएसपी केंद्रात चोरी, खून, दरोडे, अश्या विविध घटनांनी हिमायतनगर शहर व परिसर चर्चेत आले आहे. त्यापैकी पोलिसांनी केवळ सोयाबीन दुकानाच्या चोरीचा तपास लावला असून, अन्य चोरीच्या घटनांचा तपास जैसे ठेच आहे. पोलीस एक खुनाच्या आरोपीच्या शोधात असताना पुन्हा हिमायतनगर शहरातील राह्स्त्रीय महामार्गावरील पेट्रोल पंपावर डिझेल चोरी झाल्याची घटना दि.२० रोजी घडली आहे. या घटनेमुळे चोरट्यांचा शोध लावून बंदोबस्त करण्याचे मोठे आवाहन पोलिसांसमोर उभे आहे.
सध्या पेट्रोल-डिझेलची दरवाढ झाल्यानंतर सर्वसामान्य नागरिक मेटाकुटीला आला आहे, अश्यात चोरट्यांनी आता पेट्रोल-डिझेलवर डल्ला मारण्यास सुरुवात केल्याचे हिमायतनगर येथे झालेल्या या घटनेवरून समोर आले आहे. आतापर्यंत हिमायतनगर तालुक्यातील चोर महागड्या वस्तूंची चोरी करत असल्याचे अनेकवेळा समोर आले. मात्र इंधन दरवाढ झाल्याने आता डिझेलची चोरी होत असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे.
हिमायतनगर भोकर महामार्गावरील दवणे या पेट्रोल पंपाच्या टाकीतून मोटारीच्या साहाय्याने पाठीमागील शेतात कैंन ठेऊन कुण्यातरी वाहनाने चोरट्याने तब्बल २ लक्ष ८६ हजार ९३४ रुपये किमतीचे ३ हजार लीटर डिझेल चोरून नेल्याचा धक्कादायक प्रकार घडला आहे. ही घटना मध्यरात्री १ ते २ वाजेच्या दरम्यान घडली. परत चोरटयांनी सीसीटीव्हीवर बांधलेला कापड काढून नेले. हा प्रकार दुसऱ्या सीसीटीव्हीमध्येय आला असून, तो स्पष्ठ दिसत नाही. अशी फिर्याद पेट्रोल पंप चालक परीक्षित दवणे यांनी हिमायतनगर पोलीस ठाण्यात दिली आहे. या घटनेचा तपास पोलीस निरीक्षक भगवान कांबळे यांच्या मार्गदर्शनाखाली जमादार सिंगणवाड हे करत आहेत.