नांदेड। नांदेड महानगरपालिका क्षेत्रात येणारा वाघाळा-हडको-सिडको भाग हा अनेक वर्षांपासून विकासाच्या दृष्टीने मागासलेला दिसतो आहे. गत 9 वर्षात मुख्यरस्त्याचा काही भाग वगळता इथे कसलेही रस्त्यांचे कामे झाली नसावीत असे निदर्शनास येते.
सद्यस्थितीत महाराणा प्रतापसिंह चौक ते हडको बसस्थानक हा मुख्य रस्ता पूर्णपणे खड्डेमय झालेला आहे,या मुख्यरस्त्यावर अनेकवेळा पाणीपुरवठा व ड्रेनेजची कामे केली,ती कामे करत असताना रस्ते उकरले गेले परन्तु ते रस्ते पूर्ववत करण्यासाठी कोणत्याही लोकप्रतिनिधी यांची मागणी दिसून आली नाही.
पाणीपुरवठा/ड्रेनेज किंवा अन्य कोणतेही काम केल्यानंतर त्या रस्त्यांचे खड्डे पूर्ववत करून देणे हा उल्लेख त्यांच्या कामांच्या निविदेत असावा असे समजते, परन्तु हडको-सिडको परिसरात असे कामानिमित्त करण्यात आलेल्या कोणत्याही खड्डयांचे रिस्टोरेशन करण्यात आले नाही.
याबद्दल मनपाचे विद्यमान अतिरिक्त आयुक्त तथा बांधकाम अभियंता यांनी रस्त्यांच्या दुरुस्ती का केली गेली नाही? याविषयी एक चौकशी समिती नेमून झालेल्या कामांची पाहणी करावी व तात्काळ या रस्त्यांची दुरुस्ती करून देण्यात यावी. विहित वेळेत व नियमाप्रमाणे दुरूस्ती करण्याच्या कामांवर प्रतिबंध लावणे मनपा अधिकाऱ्यांकडून होत नसेल तर हडको-सिडको विकासावर मनपाचे दुर्लक्ष म्हणणे वावगे ठरणार नाही...!
हडको-सिडको नागरिक शहरातील प्रत्येक नगराच्या बरोबरीने कर देतात तर सोयीसुविधाविषयी मनपा आयुक्त,अतिरिक्त आयुक्त,उपायुक्त(सर्व) व अभियंता हे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करत असतील तर नक्कीच जनता आपल्याला कर देण्यासाठी रस्ताच दाखवेन अशी प्रतिक्रिया युवा पत्रकार - गजानन जोशी यांनी दिली.