नांदेड| दैवी शक्ती असल्याचा भास निर्माण करुन अंधश्रद्धा पसरविणार्या कासराळी येथील भोंदू बाबाचा भांडाफोड करुन अंधश्रद्धा निर्मूलन समिती व पोलीसांनी अटक केली आहे.
बिलोली तालुक्यातील कासराळी येथे दस्तगीर दर्ग्यावरील तौफिकबाबाकडे दररोज अनेक नागरिक समस्या व आजारा संदर्भात जात होते. नागरिकांकडून तोफिकबाबा पैसे उकळत असत. समस्या घेऊन गेलेल्या नागरिकांना तुमची समस्या व आजार जादुटोना किंवा करणीमुळे झालेला आहे, असे सांगून नागरिकांमध्ये भीती निर्माण करीत असत. काही नागरिकांना एकत्र गोळा करुन आपल्या अंगात दैवी शक्ती असल्याचा भास तौफिकबाबा हा निर्माण करायचा.
एका तक्रारीनंतर नांदेड जिल्हा अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या कार्यकर्त्यांनी याबाबत बिलोली पोलीस स्टेशन येथे जावून पोलीस अधिकार्यांना सविस्तर माहिती दिली. त्यानंतर बिलोली पोलीस व अंनिसचे पदाधिकारी सम्राट हटकर, कमलाकर जमदाडे व कार्यकर्त्यांनी स्टिंग ऑपरेशन कासराळी येथे जावून केले. त्यामध्ये तौफिकबाबा याचा भांडाफोड झाला आहे.
पोलीस निरिक्षक शिवाजी डोईफोडे व पोलीस कर्मचार्यांनी तौफिकबाबा यास अटक करुन त्याच्या विरोधात बिलोली पोलीस ठाण्यामध्ये जादूटोणा विरोधी कायद्यान्वये गुन्हा दाखल केला आहे. या भांडाफोड प्रकरणांमध्ये पोलीस उपनिरीक्षक सय्यद एम. झेड, फौजदार रूपाली कांबळे, पोलीस शिपाई शिंदे जी. बी., भारत फंताडे, कोरनोळे बी. एस. या पोलीस कर्मचार्यांनी सहभाग घेतला होता.