हिमायतनगर पोलीस ठाण्याला दारू विक्रेत्याची केली नावासह तक्रार
हिमायतनगर| तालुक्यातील मौजे सरसम बु. येथे अवैध देशी दारूचा व्यवसाय बिनबोभाट पणे चालू असून अवैध दारू विक्रेते निगरगट्ट होवून आपला गोरखधंदा जोमाने चालवत असून, पोलिसांचे या बाबींकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष होत आहे. खुद्द तंटामुक्त समिती अध्यक्षानेच घेतली पोलीस ठाण्यात धाव, पोलीस ठाण्याला दिलेल्या तक्रार निवेदनात चक्क गावातील दारू विक्रेत्याची नावेच टाकून पोलीसांची चौकशी सोपी केली असून, गावातील अवैध दारू विक्री तात्काळ बंद करावी. अन्यथा आमरण उपोषण करण्याचा इशारा महात्मा गांधी गांव तंटामुक्त समितीच्या अध्यक्षा सौ. सिमाबाई गंगाधर गोखले यांनी दिला आहे.
हिमायतनगर पोलीस ठाण्याला दिलेल्या निवेदनात सौ. सिमाबाई गोखले यांनी म्हटले आहे की, सरसम येथे अवैध देशी दारू विक्रेत्यांनी उच्छाद मांडला आहे. गेल्या अनेक महिन्यांपासून गावात व तसेच इंदिरानगर नवी अबादी येथे मोठ्याप्रमाणात अवैध रित्या देशी दारूची विक्री होत असून दररोज या अवैध देशी दारूच्या व्यवसायात हजारो रूपयांची उलाढाल होत आहे. या विषारी दारूच्या आहारी गेलेल्या अनेक गोरगरीब नागरिकांचे संसार उघडय़ावर आले आहेत.
तसेच पाहीजे त्या ठिकाणी दारू उपलब्ध होत असल्याने ओठांवर मिसरूड न फुटलेली पोरं ही दारूच्या आहारी जात असून त्यांचे आयुष्य अधांतरीच पडले जात आहे. स्थानिक पोलीसांना या अवैध दारू विक्रेत्यांकडून माहेवारी ठराविक प्रमाणात हप्ता मिळत असल्यामुळे की, काय? पोलीस कारवाई करण्यास टाळाटाळ करीत आहेत. गावात या अवैध दारू चे अनेकजण व्यवसाईक होवून वरकमाईचा गोरखधंदा बेडरपणे चालवत असून या बाबींकडे जिल्हा पोलीस अधीक्षक प्रमोद कुमार शेवाळे यांनी तात्काळ लक्ष वेधून अवैध देशी दारू विक्रेत्यांच्या मुसक्या आवळाव्यात.अशी मागणी तंटामुक्त गाव समितीच्या अध्यक्षा सौ. सिमाबाई गोखले यांनी केली असून पोलीसांनी कारवाईस टाळाटाळ केल्यास दि. १२ फेब्रुवारी पासून तहसिल कार्यालयासमोर आमरण उपोषण करण्यात येईल. असा इशारा देण्यात आला आहे.
ग्राम पंचायत पदाधिकारी यांनी ही ग्राम पंचायत ठरावासह केली अवैध दारूची तक्रार
सरसम येथील अवैध देशी दारू विक्रेत्यांनी आपला अवैध दारू विक्रीचा व्यवसाय हा आपली मक्तेदारी समजून चालविला, परिणामी गावात अशांतता पसरत असून कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. गावातील शांतता अबाधित राहणे गरजेचे समजून अवैध दारू विक्री बंद करण्यात यावी. असा पवित्रा ग्राम पंचायतीचे उपसरपंच अँड. अतुल वानखेडे व त्यांच्या टिम ने घेतला असून स्थानिक पोलिसांच्या कार्यक्षमतेवर प्रश्न चिन्ह उभे टाकले आहे.
गावात सध्या साईबाबा मंदीरात सप्ताह चालू असून या पवित्र वातावरणात दारूड्याचा गंदागाबडेव कार्यक्रम चालू आहे. गावातील व्यसनाधीनचे प्रमाण कमी होणे, काळाची गरज असून उपसरपंच अँड. अतुल वानखेडे यांनी चक्क ग्राम पंचायतीचा दारू बंदीचा ठरावच चक्क पोलीस ठाण्याला सादर केला आहे. पोलीसांनी वेळीच अवैध दारू विक्रेत्यावर कारवाई केली नाही तर लोकशाही मार्गाचा अवलंब करण्यात येईल. असा इशारा अँड. अतुल वानखेडे, यांनी सरपंच सौ. काशिबाई सखाराम ठाकुर यांच्यासह सर्व ग्राम पंचायत सदस्यांच्या वतीने दिला आहे.