प्रजाहितदक्ष राजा छत्रपती शिवाजी महाराज - NNL


छत्रपती शिवाजी महाराज हे जगातील आदर्श नेतृत्व आहे. त्यांनी रयतेच्या हितासाठी लोककल्याणकारी स्वराज्याची स्थापना केली. लोकहित डोळ्यांसमोर ठेवून राज्यकारभार करण्याबरोबरच त्यांनी समता, बंधुता या मूल्यांची प्रतिष्ठापना केली.  सर्व नागरिकांच्या हितासाठी कटिबद्ध असलेल्या स्वराज्य निर्मिती बरोबरच त्यांचे सामाजिक परिवर्तनाचे कार्य आज जगभर प्रेरणा ठरले आहे.

छत्रपती शिवरायांनी आपल्या कारभारातून समानतेचे तत्व जोपासले. त्यांनी सैन्याबरोबर राहून सर्व कसोटीच्या व संकटाच्या प्रसंगांना धैर्याने तोंड दिले. सर्व जातिधर्माच्या लोकांना कार्यात समाविष्ट करून घेतले. त्यांना सन्मान दिला. सर्वांना स्वराज्यात महत्त्वाचे स्थान दिले. सर्व विरोधी सत्तांना पाणी पाजणारे सैन्य छत्रपती शिवरायांनी निर्माण केले. कुठल्याही भेदभावाला स्थान दिले नाही. त्यामुळे शिवरायांच्या निधनानंतर निर्माण झालेल्या संकटाच्या काळात मावळ्यांनी जगाच्या पाठीवरील अनेक बलाढ्य साम्राज्यसत्तांशी संघर्ष करून स्वराज्य अबाधित ठेवले. शिवरायांचे जीवनकार्य जगातील समस्त नेतृत्वासाठी प्रेरणा ठरत आले आहे.

छत्रपती शिवाजी महाराज यांचा लढा हा परिवर्तनासाठी होता. रानावनात राहणाऱ्या, शेतात राबणाऱ्या गोरगरीबांसाठी होता. त्यांची 'मुद्रा भद्राय राजते' ची मुद्रा समस्त प्रजेला विश्वास व संरक्षण व हिताची ग्वाही देणारी होती. शिवरायांचे पिताजी शहाजीराजे महाराजसाहेबांनी छत्रपती शिवरायांना बालपणीच राजमुद्रा देऊन त्यांच्या जीवनाचे ध्येय दर्शवले होते.

प्रतिपच्चंद्रलेखेव वर्धिष्णुर्विश्ववन्दिता ।।
शाहसूनोः शिवस्यैषा मुद्रा भद्राय राजते ।।

अर्थात, प्रतिपदेचा चंद्र जसा कलेकलेने वाढतो आणि साऱ्या विश्वात वंदनीय होतो, तसा शहाजीराजेंचे पुत्र शिवाजी महाराजांच्या मुद्रेचा लौकिक वाढत जाईल आणि अवघ्या विश्वासाठी ती कल्याणकारी राहील. मोठ्या दूरदृष्टीने ही राजमुद्रा तयार करणाऱ्या शहाजीराजेंचे लोकहिताचे विचार व ध्येय याद्वारे स्पष्ट होतात. हे स्वराज्य स्वत:साठी नसून, प्रजेच्या कल्याणासाठी आहे असा विश्वास छत्रपती शिवाजी महाराजांनी रयतेला दिला. त्यामुळेच ही राजमुद्रा विश्ववंदनीय आहे.

छत्रपती शिवाजी महाराज हे केवळ राजे नव्हते तर ते खऱ्या अर्थाने राष्ट्रनिर्माते होते. त्यांनी स्थापन केलेल्या लोककल्याणकारी राज्याचे उदाहरण आजही आदर्श आहे. शिवरायांनी कृषी विकास, जलसिंचन,  पर्यावरण संवर्धन, लोककल्याणकारी प्रशासन, उद्यमशीलता अशा विविध बाबतीत विकासाचा परिपूर्ण दृष्टिकोन निर्माण केला. शिवाजी महाराजांनी जलसंवर्धन, वनसंवर्धन, ग्रामस्वच्छता, लोकाभिमुख प्रशासन अशा विविध दृष्टिकोनातून एक खऱ्या अर्थाने आधुनिक राज्य स्थापन केले.

व्यापक लोकहित साधणारी सक्षम यंत्रणा शिवाजी महाराजांनी निर्माण केली. त्यांचे प्रशासकीय कौशल्य जगभरातील प्रशासकांसाठी प्रेरणादायी आहे. राज्यातील शेतकरी, गोरगरीब यांच्याबाबतची तळमळ त्यांच्या पत्रव्यवहार व वेळोवेळी जारी केलेल्या आदेशावरूनही दिसून येते.  'रयतेला काडीचाही त्रास देण्याची गरज नाही. रयतेच्या दाणे, भाकर, गवत, फाटे, भाजीपाला यांना हातदेखील लावायचा नाही. प्रत्येकवेळी सर्वदूर फिरून लोकांशी संपर्क ठेवावा. शेतकरी बांधव, शेती व पशुधनाची काळजी घ्यावी,' असे आदेश त्यांनी अधिका-यांना दिले होते. 

शेतकरी बांधवांना बैलजोडी व बी-बियाणे यासाठी बिनव्याजी कर्जपुरवठा करण्याचे आदेशही त्यांनी दिले होते. दुष्काळ निवारणासाठी त्यांनी पाणी साठवण योजना राबवली. प्रत्येक बाबतीतील सुस्पष्ट आदेश व त्यांच्या अंमलबजावणीतील सुसूत्रता यामुळे शिवकाळात कारभाराची घडी नीट बसून शेती व व्यापाराला चालना मिळाली. व्यापारी पेठा, बंदरे, आरमार यांचा विकास झाला. छत्रपती शिवाजी महाराजांची दूरदृष्टी, करारीपणा, पराक्रम, सहिष्णूता, लोकहिताची तळमळ यामुळे एक सर्वोत्तम राज्यव्यवस्था स्वराज्याच्या रूपाने निर्माण झाली. त्यांचे जीवनकार्य आजही जगभरातील प्रशासकांसाठी प्रेरणादायी आहे.

.....हर्षवर्धन पवार, जिल्हा माहिती अधिकारी, अमरावती

Post a Comment

please do not enter any spam link in the comment box

Previous Post Next Post
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी