आ.राजूरकर यांच्या नेतृत्वाखाली शिष्टमंडळाची मंत्री वड्डेटीवार यांच्याकडे मागणी
नांदेड| शासनाने तांडा वस्तीच्या अनुदानाची मर्यादा निश्चित केली आहे. परंतु त्यात बराच कालावधी गेला आहे. त्यामुळे लोकसंख्येच्या प्रमाणात वस्त्यांमध्ये सोयी-सुविधा उपलब्ध होत नाहीत. शासनाच्या मुळ हेतूला बाधा निर्माण होते. विमुक्त व भटक्या जमातीचा विकास व्हावा यासाठी समाज कल्याणच्या धर्तीवर तांडा वस्ती आराखडा अनुदानाची रक्कम वाढविण्यात यावी अशी मागणी आ.अमरनाथ राजूरकर यांच्या नेतृत्वाखालील एका शिष्टमंडळाने मंत्री विजय वड्डेटीवार यांच्याकडे केली आहे.
नांदेड येथील जिल्हा परिषद पदाधिकाऱ्यांच्या शिष्टमंडळाने महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे उपाध्यक्ष व विधान परिषद प्रतोद आ.अमरनाथ राजूरकर यांच्या नेतृत्वाखाली राज्याचे इतर मागासवर्गीय, विमुक्त जाती, भटक्या जमाती आणि विशेष प्रवर्ग कल्याण मंत्री विजय वड्डेटीवार यांची आज दि.23 रोजी मुंबईत भेट घेतली. या भेटी दरम्यान त्यांनी तांडा वस्त्यांच्या विकासामध्ये येणाऱ्या अडचणी व समस्या मंत्र्यांपुढे मांडल्या.
शासनाच्या कल्याणकारी योजना अधिक प्रभावीपणे राबविण्यासाठी व जिल्ह्यातील तांड्यांना मुलभूत सुविधा उपलब्ध करुन देण्यासाठी समाजकल्याणच्या धर्तीवर तांडा, वस्ती आराखडा अनुदानाची रक्कम वाढवा अशी मागणी या शिष्टमंडळाने मंत्री विजय वड्डेटीवार यांच्याकडे केली.या शिष्टमंडळात आ.अमरनाथ राजूरकर यांच्यासमवेत जिल्हा परिषदेचे शिक्षण व बांधकाम सभापती संजय बेळगे, समाज कल्याण सभापती ॲड.रामराव नाईक, उद्योजक दिनेश बाहेती यांचा समावेश होता.