हिमायतनगर,अनिल नाईक| गेल्या काही वर्षांपासून राज्यभरात कोरोना महामारीने कहर केला असुन तिसरी लाट येण्यापूर्वी आरोग्य विभागाने दक्षता घेऊन गावा गावातील लसीकरण शंभर टक्के पुर्ण करण्यासाठी आरोग्य कर्मचारी प्रयत्न करीत आहेत. विशेष म्हणजे शुक्रवारी सवना उप आरोग्य केंद्रांच्या कर्मचाऱ्यांनी गणेशवाडी शिवारात उसाच्या फडावर जाऊन उसतोड कामगाराचे लसीकरण केले आहे. या आरोग्य कर्मचाऱ्यांच्या कामाबद्दल प्रशासनाकडून कौतुक होत आहे.
हिमायतनगर तालुक्यात आरोग्य प्रशासनाने प्रत्येक गावात कोविड लसीकरण करण्यासाठी ग्रामपंचायत स्तरावर लसीकरण शिबीर आयोजित केले होते. काही गावे शंभर टक्के लसीकरण पुर्ण झाली तर काही गावात मात्र अद्यापही अपुर्ण राहिले आहेत. एकही लाभार्थी वंचित राहु नये यासाठी कोविड लसीकरण करीता शासन स्तरावरून विविध उपाययोजना राबविण्यात येत आहेत.
हिमायतनगर आरोग्य विभागातील कर्मचारी हे आहोरात्र आरोग्य सेवा देण्याचे काम करीत असून, त्या अनुषंगाने प्राथमिक आरोग्य केंद्र चींचोर्डी येथील वैद्यकीय अधिकारी डॉ. दामोदर राठोड, यांच्या मार्गदर्शनाखाली सवना उप आरोग्य केंद्रातील कर्मचारी हे नागरिकांना आरोग्य सेवा देण्यासाठी कुठेही कमी पडत नसल्याचे दिसत आहे. गणेशवाडी परिसरात मागील काही दिवसापासून आपल्या कुटुंबासह ऊसतोडीसाठी बाहेरगावाहून आलेल्या ऊस तोड मजूराना संपर्क साधून आपण कोविडची लस घेतली का अशी विचारणा केली.
असता त्यापैकी बऱ्याच मजुरांनी लस घेतली नसल्याचे कर्मचाऱ्याना कळाले त्यावरून सवना उप आरोग्य केंद्रातील कर्मचाऱ्यांनी त्या ऊसतोड मजुरांच्या वस्तीवर व उसाच्या फडात जाऊन ज्या लाभार्थ्यांनी कोविड19 लस घेतली नाही अशा नागरिकां बद्दल माहिती सांगून त्यांना लस घेण्यासाठी प्रोत्साहित केले. ऊसतोड मजुरांनी पुढाकार घेऊन लसीकरण करून घेतले उसतोड मजुरांनी आरोग्य कर्मचाऱ्यांना चांगला प्रतिसाद दिला. उसाच्या फडावर जाऊन आरोग्य कर्मचाऱ्यांनी लसीकरण करून घेतल्याबद्दल आरोग्य विभागाकडून कर्मचाऱ्यांचे कौतुक होत आहे. यावेळी आरोग्य केंद्राचे सि. एच.ओ. डॉ. परभणकर, आरोग्य सुपरवायझर श्रीमती राव मॅडम, श्रीमती आलुरे मॅडम,व नव्यानेच आलेले एम. पी. डब्ल्यू अशोक गायकवाड, आदि आरोग्य कर्मचाऱ्यांनी या ऊसतोड मजुरांचे लसीकरण करून घेतले आहे.