श्री रेणुका देवी संस्थानातील कर्मचाऱ्यांच्या आंदोलनाला झाले ४२ दिवस; सहाय्यक जिल्हाधिका-यांची उदासिनता शिगेला पोहचतेय -NNL

पुढील चार दिवसांत मागण्या सूटल्या नाहीतर पालक मंत्र्यांच्या घरा समोर यज्ञ व अभिषेक


नांदेड|
माहूर गडावरील श्री रेणुका देवी संस्थानातील सीटू संलग्न कर्मचारी युनियनच्या कर्मचाऱ्यांच्या सत्याग्रहास दि. २० फेब्रुवारी ४२ दिवस पूर्ण झाले आहेत.मागील दहा ते पंधरा वर्षापासून अखंड सेवेत असणाऱ्या कर्मचाऱ्यांनी सीटू संलग्न मजदूर युनियनचे रितसर सभासदत्व स्विकारून सन २०१७ मध्ये शाखा स्थापन केली आहे.

 संस्थानचे अध्यक्ष हे  जिल्हा व सत्र न्यायालयाचे प्रमुख न्यायाधीश,सचिव सहाय्यक जिल्हाधिकारी  किनवट,उपाध्यक्ष उप विभागीय पोलीस अधिकारी माहूर तर " कोषाध्यक्ष म्हणून तहसिलदार माहूर हे पदसिद्ध पदाधिकारी आहेत.विश्वस्त म्हणून इतर पाच अशासकीय सदस्य येथे कार्यरत आहेत. कामगार कर्मचारी कायद्याने १४२ दिवस पूर्ण झालेल्या कर्मचाऱ्यांना कायम करणे असे बंधनकारक असताना माहूर गडावरील पब्लिक ट्रस्ट मधील कर्मचाऱ्यांना अद्याप कायम केले नाही तसेच संस्थानातील कर्मचाऱ्यांना दरमहा वेतन देखील आठ ते दहा हजार रुपये एवढेच दिले जाते.

मा.सर्वोच्च न्यायालयाच्या मार्गदर्शक सुचने प्रमाणे किमान वेतन कायद्याची अंमलबजावणी देखील होताना दिसत नाही.तेथील कर्मचाऱ्यांनी सन २०२० मध्ये गडावर माता रेणुकेच्या पायथ्याशी दि.२७ ते ३१ जानेवारी असा पाच दिवस सत्याग्रह केला होता आणि तत्कालीन संस्थानचे सचिव तथा सहाय्यक जिल्हाधिकारी किनवट श्री अभिनव गोयल भा.प्र.से. यांनी युनियनचे अध्यक्ष कॉ.गंगाधर गायकवाड व स्थानिक समितीचे अध्यक्ष कॉ.श्रावण जाधव यांच्या नावाने लेखी पत्र देऊन संस्थानच्या सर्व कर्मचाऱ्यांना समय वेतन श्रेणी नुसार कायम सेवेचे आदेश देण्यात येतील व किमान वेतनाची पूर्तता करण्यात येईल असे लेखी आश्वासन देऊन सत्याग्रह थांबविला होता.दोन वर्षे उलटून गेले तरी अंमलबजावणी होत नसल्याने संस्थानातील ७० कर्मचाऱ्यांनी पुन्हा दि.१० जानेवारी २०२२ पासून माता रेणुकेच्या पहिल्या पायरी जवळ बैठा सत्याग्रह सुरू केला आहे.देवीच्या दर्शनासाठी येणाऱ्या भाविक भक्तांना कसल्याही प्रकारची अडचण येऊ नये म्हणून सर्वच कर्मचारी आपले कर्तव्य चोखपणे बजावत आहेत.

सदरील सत्याग्रहाला पाठिंबा देत कर्मचाऱ्यांच्या रास्त व कायदेशीर मागण्या तातडीने सोडवाव्यात म्हणून अ.भा.किसान सभा व स्टूडंट फेडरेशन ऑफ इंडियाच्या शेकडो कार्यकर्त्यांनी दि.२१ जानेवारी रोजी माहूर येथील गडाकडे जाणाऱ्या टि पॉईंट येथे दोन तास चक्का जाम आंदोलन करून शासनाचे लक्ष वेधले आहे. परंतु संस्थानाच्या प्रशासकीय सचिवावर याचा काहीही परिणाम झाला नाही.त्यानंतर दि.२५ ते २७ जानेवारी असे तीन दिवस माहूर तहसिल कार्यालया समोर सीटू,किसान सभा व एसएफआयच्या वतीने कडाक्याच्या थंडीत एकशे बावन्न लोकांनी उपोषण करून गडावारील कर्मचाऱ्यांच्या मागण्या सोडवून त्यांच्या तयार करण्यात आलेल्या सेवा पुस्तिका देऊन सत्याग्रह सोडवावा यासाठी निवेदन दिले होते. 

तेव्हा तहसिलदार माहूर यांनी देखील सर्व मागण्या सोडविण्यात येतील असे लेखी पत्र दिले आहे. निवेदनाच्या प्रति मुख्यमंत्री,राज्यपाल,विभागीय आयुक्त,जिल्हाधिकारी,धर्मदाय आयुक्त आणि संस्थानचे अध्यक्ष व सचिवांना देण्यात आल्या आहेत.कर्मचाऱ्यांच्या कायदेशीर मागण्या सोडवाव्यात यासाठी मुख्यमंत्री ना.उद्धव ठाकरे,राज्य मंत्री ना.बच्चू कडू,खा.संभाजी राजे,सीटूचे राष्ट्रीय उपाध्यक्ष डॉ.डी.एल.कराड, किनवट माहूर विधान सभा मतदारसंघाचे आ.भीमराव केराम व अन्न इतरांनीही सहाय्यक जिल्हाधिकारी किनवट यांना पत्रे देऊन कारवाई करण्यासाठी विनंती केली आहे.परंतु संस्थानचे सचिव तथा सहाय्यक जिल्हाधिकारी किनवट श्री किर्तीकिरण पुजार भा.प्र.से. हे कर्मचाऱ्यांच्या मागण्या सोडविण्यासाठी खूपच उदासीन आहेत.

या अनुषंगाने विविध आंदोलने करूनही संस्थानचे सचिव लक्ष देत नसतील व कायदेशीर मागण्याची पूर्तता करीत नसतील तर नाईलाजाने राज्य सरकारचे कैबिनेट मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री ना.अशोक चव्हाण यांच्या बंगल्या समोर माता रेणुकेच्या कर्मचाऱ्यांच्या सेवा पुस्तिका देण्यात याव्यात व पगार वाढ करून किमान वेतनाची पूर्तता करावी. यासाठी यज्ञ व अभिषेक करून बेमुद्दत बैठा सत्याग्रह करणार असल्याचे मत सीटू सह कर्मचाऱ्यांना समर्थन देणाऱ्या इतर संघटनांच्या पदाधिका-यांचे झाले आहे. आपल्या अधिकाराचा वापर करून जिल्हाधिकारी नांदेड यांनी जमाव बंदी व इतर आदेशाच्या अनुषंगाने जिल्हाधिकारी कार्यालय समोर व परिसरात आंदोलन करण्यावर बंदी घातली आहे. त्यामुळे पुढील चार दिवसांत माहूर गडावरील श्री रेणुका देवी संस्थानातील कर्मचाऱ्यांच्या मागण्या सोडविल्या नाहीतर यज्ञ आणि अभिषेक करणार असल्याचे सीटूचे जिल्हा जनरल सेक्रेटरी कॉ.गंगाधर गायकवाड कळविले आहे.

Post a Comment

please do not enter any spam link in the comment box

Previous Post Next Post
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी