कामगारांच्या बोलीभाषेतील शब्द साहित्यात यावेत - अशोकराज कांबळे
नांदेड|आतडं तुटतं...काळीज फाटतं..भोकं पडतात छातीला तवा कुठं आकार येतो...राख भूसा मातीला ... या कवितेने वीटभट्टीवर काम करणाऱ्या कामगारांच्या काबाडकष्टाचे वर्णन करीत विविध ठिकाणी रक्त आटवून समाजातील अनेक स्तरातील लोकांची भाकर कशी तयार होते याचा साक्षात्कार करणारी कविता सप्तरंगी साहित्य मंडळाचे राज्याध्यक्ष अनुरत्न वाघमारे यांनी सादर केली.
त्यानंतर कामगार साहित्य चळवळीचे अभ्यासक अशोकराज कांबळे म्हणाले की, कामगारांचीही एक बोली असते. त्यात कामानुसार शब्द असतात. कामगार, कारागीर, रोजमजूर, शेतमजूर यांच्या भावविश्वातील शब्द साहित्यात आले पाहिजेत. विविध बोली भाषेबरोबरच कामगारांच्या बोलीभाषेलाही साहित्यात स्थान मिळाले पाहिजे तरच मराठी भाषा समृद्ध होईल आणि सर्वच स्तरांतून मराठीचे संवर्धन होईल.
येथील सप्तरंगी बहुउद्देशीय सेवाभावी संस्था संचलित सप्तरंगी साहित्य मंडळाच्या वतीने प्रजासत्ताक दिन आणि मराठी भाषा संवर्धन पंधरवड्यानिमित्त वाजेगाव परिसरातील राधास्वामी सत्संग भवनाजवळ कामगार बोलीभाषा कविसंमेलनाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी प्रमुख अतिथी म्हणून ज्येष्ठ कवी शरदचंद्र हयातनगरकर, गोतम कांबळे, विशालराज नांदेडकर यांची उपस्थिती होती.
सर्व प्रथम हुतात्मा दिवस असल्याने महात्मा गांधी यांच्या प्रतिमेला आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. त्यानंतर कविसंमेलनास प्रारंभ झाला. या कविसंमेलनात कवी प्रकाश ढवळे नागलगांवकर, मारोती कदम, राहुल जोंधळे, सुनील नरवाडे, साईनाथ रहाटकर, अनुरत्न वाघमारे, नागोराव डोंगरे, गंगाधर ढवळे, रणजीत गोणारकर, विशाल नांदेडकर, गौतम कांबळे, शरदचंद्र हयातनगरकर आदींनी एकसे बढकर एक कविता सादर केल्या.
सप्तरंगी साहित्य मंडळाच्या वतीने हुतात्मा दिनानिमित्त सर्व कवीवृंद आणि कामगारांनी दोन मिनिटे स्तब्ध राहून शहिदांना श्रद्धांजली वाहिली. कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रज्ञाधर ढवळे यांनी केले. सूत्रसंचालन नागोराव डोंगरे यांनी केले तर आभार वाघमारे यांनी मानले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी प्रिया गायकवाड, अनुसया कांबळे, चांगुणा एडके, आशा एडके, माया एडके, सोनी गोविंद, शितल गोविंद, रोशनी गायकवाड, आकांक्षा गायकवाड राहुल गायकवाड, गोविंद कांबळे, निवृत्ती एडके, सुरेश एडके, रविकिरण एडके, गणेश एडके, माधव मेकाले, कुणाल भुजबळ, माधव शिंदे, सिध्दार्थ गजभारे, शै. सलीम, निखिल जोंधळे, हनिफ शेठ, किसन तारु, निखिल दामोदर, सतिश ढवळे, देवा गायकवाड, डोमपल्ले, हैबती शिंदे, विठ्ठल शिंदे, छायाबाई मेकाले, सुषमा शिंदे, पुजा शिंदे, शोभाताई एडके, नागेश मेकाले, अरविंद जुळवेकर, लता अरविंद जुळवेकर यांनी परिश्रम घेतले.