हिमायतनगर| गुरुदेव सेवा मंडळाच्या वतीने छत्रपती शिवाजी महाराज आणि थोर समाज सुधारक संत गाडगे महाराज यांच्या जयंतीचे औचित्य साधून हिमायतनगर शहरासह ग्रामीण भागात गेल्या ५ दिवसापासून जनजागृती सप्ताह साजरा केला जात आहे.
हिमायतनगर पोलीस ठाण्याच्या बाजूला असलेल्या राष्ट्रसंत तुकडोजी महाराज प्रार्थना केंद्र व गुरुदेव सेवा मंडळ समितीचे अध्यक्ष रामराव पाटील सोनारीकर नेतृत्वखाली गेल्या ५ दिवसापासून गुरुदेव सेवा मंडळाचे कार्यकर्ते यांनी वाहनातून शहरासह तालुक्यातील बोरगडी, धानोरा, वारंगटाकळी, मंगरूळ, खैरगाव, वडगाव तांडा, सवाना, जिरून, वाशी, महादपूर, दगडवाडी, एकघरी, दरेसरसम, पवना, खडकी, घारापुर सह अनेक गावात भेटी देऊन, छत्रपती शिवाजी महाराज आणि राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांचा संदेश आणि ग्रामगीता भेट देऊन जनजागृती केली.
यावेळी गुरुदेव सेवा ,मंडळाच्या कार्यकर्त्यांनी ठिकठिकाणी गावात फेरी काढून व्यसनमुक्ती, झाडे लावा झाडे जगवा, स्वच्छता करून गावाला सुंदर बनवा, गावातील नागरिकांनी एक गट तयार करून दररोज सामुदायिक प्रार्थना करावी. आणि समाज उपयोगी कार्यक्रम राबवावे. तरच छत्रपती शिवाजी महाराज आणि संत गाडगे बाबा यांची जयंती केल्याचे समाधान मिळेल असा संदेश दिला.
या सप्ताहात ग्रामगीता प्रचारक मंडळी माजी अध्यक्ष विठ्ठलराव फुलके, श्रीधरराव महाराज, गणपतराव इंगळे, विठ्ठलराव देशमवाड, परमेश्वर अक्कलवाड, गोविंद पाटील कदम, परमेश्वर इंगळे, परमेश्वर मादसवार, संभाजी अक्कलवाड, संजय दुधडकर, सुधाकर मुत्तलवाड, पतंगे सर, ऑटोचालक ज्ञानेश्वर काल्लोरे यांनी परिश्रम घातले. त्यांच्या या मेहनतीला अनेकांनी प्रतिसाद दिला आणि यापुढे आमच्या गावात येऊन सामुदायिक प्रार्थना आणि सुसंस्कार शिबीर राबवा असे आमंत्रणही दिले.