सोसायटी ताब्यात ठेवण्यासाठी नेत्यांची प्रतिष्ठा पणाला; निवडणूक अटीतटीची होणार
हिमायतनगर, अनिल मादसवार| आगामी काळात जिल्हा परिषदेच्या निवडणूक होणार असल्याने प्रमुख पक्षाच्या राजकीय नेत्यांनी सोसयटीची निवडणूक प्रतिष्टेच्या केल्या आहेत. सध्या हिमायतनगर शहरासह ग्रामीण भागातील सोसाट्याच्या निवडणुकांची रणधुमाळी सुरु आहे. त्यापैकी हिमायतनगर सोसायटी निवडणूक हि १३ जागेसाठी होत असून, या निवडणुकीत कोण बाजी मारेल यावर राजकीय नेत्यांचे वर्चस्व सिद्ध होणार आहे. त्यामुळे हिमायतनगर सोसायटी आपल्या ताब्यात ठेवण्यासाठी शिवसेना- काँग्रेसच्या दोन्ही राजकीय नेत्यांनी कंबर कसल्याने हि निवडणूक अटीतटीची होणार असल्याचे चित्र सध्याच्या वातावरणावरून दिसून येत आहे.
हिमायतनगर येथील सेवा सहकारी सोसायटीची निवडणूक दि.29 जानेवारी रोजी होणार आहे. यासाठी काँग्रेस पक्षाच्या नेत्यांनी स्वतंत्र उमेदवार निवडणूक रिंगणात उतरविले आहेत. शिवसेनेने राष्ट्रवादी पक्षाच्या काहीना सोबत घेऊन आणि काँग्रेसमधील काहीं नाराजाना उमेदवारी देऊन निवडणुकीत आपले पैनल उभे केले आहे. नामनिर्देशन दाखल करताना 13 जागेसाठी २८ उमेदवारांनी अर्ज दखल केले. त्यापैकी एकाच अर्ज छाननीमध्ये बाद झाल्याने सध्या 13 जागेसाठी 27 उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात उभे आहेत. शेवटी अर्ज परत घेण्याच्या दिवशी किती जण माघार घेतात यावर उमेदवारांचे भविष्य अवलंबून आहे.
हिमायतनगर सोसायटीच्या निवडणुकीसाठी एकूण 1 हजार 19 नागरिक मतदार करणार आहेत. हिमायतनगर सोसायटी अंतर्गत तालुक्यातील इतर ७ गावांचा समावेश आहे. गावनिहाय म्हणजे पिचोंडी - 17, वडगाव -101, डोल्हारी-184, शेलोडा -39, टेंभी - 149, पार्डी - 77, एकघरी- 47, हिमायतनगर- 505 अशी मतदार संख्या आहे. हिमायतनगर सोसायटीच्या निवडणुकीत काँग्रेस आणी शिवसेना असे दोन पैनल आहेत. शिवसेनेने काँग्रेसमधील काही नाराज व्यक्तींना आपल्याकडे ओढून घेत उमेदवारी बहाल करून एक प्रकारे सुरुंग लावला आहे. तसेच राष्ट्रवादी पक्षाचेही काही उमेदवार शिवसेनेसोबत असल्याने गेल्या अनेक वर्षांपासून काँग्रेसच्या ताब्यात असलेली हिमायतनगरची सेवा सहकारी सोसायटी आपल्या ताब्यात घेण्यासाठी शिवसेनेने चालविलेली हि राजकीय खेळी कितपत यशस्वी होईल हे पाहणे औत्सुसक्याचे ठरणार आहे.
तर विद्यमान आमदार काँग्रेस पक्षाचे आहेत, त्यामुळे सहाजिकच मतदारांचा कल हा सत्ताधारी पक्षाच्या उमेद्वाराकडे असणार आहे. एवढेच नाहीतर तर गेल्या अनेक वर्षांपासून सोसायटीचा अनुभव असलेले सदस्य काँग्रेस पक्षाने उमेदवार म्हणून दिले आहेत. तर काही नवखे उमेदवार असले तरी आगामी जिल्हा परिषद निवडणूक डोळ्यासमोर ठेऊन काँग्रेस हिमायतनगर येथील सोसायटी आपल्या ताब्यात ठेवण्यासाठी प्रयत्न करते आहे. त्यासाठी प्रत्यक्ष काँग्रेसचे बडे नेते मतदारांच्या संपर्कात असून, उमेदवारही मतदारांच्या दारी जात असल्याचे दिसते आहे. त्यामुळे हिमायतनगर सेवा सहकारी सोसायटी कोणाच्या ताब्यात जाईल हे सांगणे सध्यातरी कठीण आहे.
तालुक्यातील 12 सोसायटीच्या निवडणूक कार्यक्रम सुरू
तालुक्यातील 22 सोसायटी पैकी 12 सोसायटीच्या निवडणूक कार्यक्रम सुरू असून, त्यापैकी दरेसरसम, कोठा ज, जवळगाव, कांडली, पवना, या 5 सोसायट्या बिनविरोध निवडण्यात आल्या आहेत. त्यानंतर सीरंजणी, धानोरा, येथील निवडणूक पार पडल्या आहेत. सध्या तालुक्यातील मौजे पोटा, दाबदरी, दुधड, हिमायतनगर या ठिकाणी निवडणूक कार्यक्रम चालू असून, कामारी येथील सोसायटी निवडणुक उद्या दि.14 रोजी पार पडणार आहे. निवडणूक कार्यक्रम सुरु असलेल्या ठिकाणच्या सोसाटीचे मतदान एक दोन दिवसांच्या फरकाने होणार आहे. तर कार्ला, मंगरुळ, पळसपूर या निवडणुका लवकरच जाहीर होणार आहेत. एकंबा, वाशी, आंदेगाव, खडकी येथील प्रारूप मतदार यादी प्रसिद्द झाली आहे. आणि राहिलेल्या जीरोना, सवना, सरसम या सोसायट्यांचे प्रस्ताव पाठविण्यात येणार असल्याची माहिती तालुका सहकारी निवडणूक अधिकारी तथा सहाय्यक निबंधक सहकारी संस्था श्री एल.टी.डावरे यांनी नांदेड न्यूज लाईव्हशी बोलताना दिली.