हिमायतनगरात अवकाळी पावसामुळे गहू, हरभरा, तुरीचे मोठे नुकसान, पंचनामे करून नुकसान भरपाई द्या - NNL


हिमायतनगर, अनिल मादसवार|
गेल्या चार दिवसांपासून जिल्हाभरात ढगाळ वातावरण निर्माण होऊन सर्वदूर पाऊस झाला आहे. अजूनही ढगाळ वातावरण असल्यामुळे रब्बी पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. या नुकसानीचे पंचनामे करून हवालदिल झालेल्या शेतकऱ्यांना मदतीचा हात द्यावा अशी मागणी केली जात आहे.


गेल्या चार दिवसांपासून नांदेड जिल्ह्यासह हिमायतनगर तालुक्यात ढगाळ वातावरण निर्माण होऊन सर्वदूर पाऊस झाला आहे. अजूनही ढगाळ वातावरण असल्यामुळे गहू हरभरा या रब्बी पिकांसह खरिपातील तुरीचे मोठे नुकसान होत असल्याने शेतकरी चिंताग्रस्त बनला आहे. या नुकसानीचे पंचनामे करून हवालदिल झालेल्या शेतकऱ्यांना मदतीचा हात द्यावा अशी मागणी हिमायतनगर शहरासह, ग्रामीण भागातील, पळसपूर, घारापुरी, डोल्हारी, एकंबा, बोरगडी, सिबदरा, शेलोडा, सवना, मंगरूळ, पोटा, कामारी, पारवा आदींसह अनेक तलाठी सज्ज परिसरातील नुकसानग्रस्त शेतकरी वर्गातून केली जात आहे.

नांदेड जिल्ह्यातील बहुतांश तालुक्यात बुधवारी, गुरुवारी जोरदार अवकाळी पाऊस झाला, आजघडीलाही ढगाळ वातावरण असल्याने शेतकरी हवालदिल झाला आहे. या वातावरणामुळे खरिपातील काढणीला आलेले तुरीचे पीक उध्वस्त झाले असून, वादळी वाऱ्याने गहू, हातभार जमीनदोस्त झाला आहे. तर सतत पाऊस पडत असल्याने हरभरा हाती येण्यापूर्वीच काळा पडून करपून जात आहे. तसेच गहू पूर्ण आडवा झाला आहे, तुरही चार दिवसापासून भिजून गेल्याने बुरशी धरून पत खराब होत आहे. आता याला बाजारात विकल्यास कमी भाव येऊन आमचे आर्थिक नुकसानच होणार असल्याचे शेतकरी सांगत आहेत. याच बरोबर तालुक्यात भाजीपाला, आंबा आणि इतर फळ पिकांच्या बहरावर विपरित परिणाम होणार असल्याचे चित्र सध्याच्या वातावरणावरून दिसते आहे.

पेरणीसाठी केलेला खर्चही निघणे मुश्किल - अशोक राजाराम ढोणे


सोयाबीन अतिवृष्टीने गेल्याने लागलीच २.५ एकरावर गव्हाची पेरणी केली, आणि हरभरा सुद्धा घेतला. सुरुवातीला जमिनीतील उष्णतेमुळे पिके करपली, त्यानंतर पाणी दिल्याने पिके कशीतरी जगली. मात्र हातातोंडाशी आलेल्या पिकांच्या वेळी अवकाळी पावसाला सुरुवात झाली. त्यामुळे खरिपातील उर्वरित तुरीचे पिके खराब होईल म्हणून कापून ठेवली. ती भिजून नुकसानीत आली, आतातर तुरीला कोंब फुटू लागले आहे. त्यामुळे काढलेल्या तुरीचा उतार कमी येऊन बाजारात विक्री केल्यास भाव कमी मिळण्याची शक्यता आहे. तर गहू आडवा पडल्याने दाणे भरण्याची ताकत कमी होऊन उत्पादन घटणार आहे. हरभरा काळा पडल्याने त्यातही घट होऊन पेरणीसाठी केलेला खर्चही निघते कि नाही..? याची चिंता लागली असल्याची माहिती शेतकरी अशोक राजाराम ढोणे यांनी नांदेड न्यूज लाईव्हशी बोलताना दिली आहे.

अवकाळी पावसाने नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना हेक्टरी २५ हजार मदतीची मागणी करणार - संजय माने

 

गेल्या चार दिवसापासून सुरु असलेल्या ढगाळ वातावरण व अवकाळी पावसामुळे तूर, गव्हासह हरभऱ्याचे पीक धोक्यात आले आहे. ज्यांची पिके हाताशी आली त्यांचे पिकावर अळ्यांचा प्रादुभाव वाढला असून, अनेकांच्या पिकांना आलेल्या फुल गळून पडत आहे. त्यामुळे खरिपा पाठोपाठ यंदाचा रब्बी हंगामही हातातून जातो कि काय..? अशी भीती वाटते आहे. हि बाब लक्षात घेता शासनाने तातडीने अवकाळी पावसामुळे नुकसानीत आलेल्या रब्बी हंगामातील पिकांचे पंचनामे करून शेतकऱ्यांना हेक्टरी २५ हजारांची मदत द्यावी अशी मागणी आ. माधवराव पाटील जवळगावकर यांच्या माध्यमातून करणार असल्याची माहिती हिमायतनगर येथील सधन शेतकरी संजय माने यांनी नांदेड न्यूज लाईव्हशी बोलताना दिली आहे.

Post a Comment

please do not enter any spam link in the comment box

Previous Post Next Post
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी