दि.२९ जानेवारीला १३ जागेसाठी होणार मतदान
हिमायतनगर, अनिल मादसवार| येथील बहुचर्चित असलेल्या विविध कार्यकारी सेवा सहकारी सोसायटीच्या सार्वत्रिक निवडणूकीचा कार्यक्रम जाहीर करण्यात आला आहे. दि.२८ डिसेंबर पासून प्रत्यक्ष निवडणूक प्रक्रियेला सुरवात होणार असुन, दि.२९ जानेवारीला मतदान होणार असल्याचे राज्य सहकारी निवडणूक प्राधिकरणाने जाहीर केले असल्याची माहिती तालुका सहकारी निवडणूक अधिकारी तथा सहाय्यक निबंधक सहकारी संस्था श्री एल.टी.डावरे यांनी नांदेड न्यूज लाईव्हशी बोलताना दिली आहे.
महाराष्ट्र राज्य सहकारी सोसायटी पंचवार्षिक निवडणूक कार्यक्रम २०२१-२०२२ ते २०२६-२०२७ च्या हिमायतनगर तालुक्यातील १२ ठिकाणच्या निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर झाला. त्यापैकी हिमायतनगर येथील संस्थेच्या निवडणूक कार्यक्रमाला उद्या म्हणजे दि.२८ पासून सुरुवात होणार आहे. मतदार संघ हिमायतनगरच्या १३ जागेसाठी निवडणूक होणार असून, एकूण ११८० सभासद (मतदार) संख्या आहे. १३ सदस्य असलेल्या निवडणुकीत सर्वसाधारण सदस्य ८, अनुसूचित जाती -जमाती १ सदस्य, महिला प्रतिनिधी २ सदस्य, इतर मागासवर्गीय प्रतिनिधी १, भटक्या विमुक्त जाती जमाती व विशेष मागास प्रवर्ग प्रतिनिधी १ या जागांसाठी उमेदवार निवडणूक रिंगणात राहतील.
नामनिर्देशन पत्र विक्री व स्वीकृती - दि. २८ डिसेंबर ते ०३ जानेवारी, छाननी दि. ०४ डिसेंबर दुपारी ४ पर्यंत, वैध नामनिर्देशन पत्र यादी प्रसिध्द करणे दि. ०५ जानेवारी, उमेदवारी अर्ज माघार- दि. ०५ जानेवारी ते १९ जानेवारी, अंतीम उमेदवारांची यादी प्रसिध्दी व निशाणी वाटप दि. २० जानेवारी, प्रत्यक्ष मतदान दि. २९ जानेवारीला सकाळी ८ ते ४ पर्यंत होणार असून, मतमोजणी दि.२९ जानेवारी सायंकाळी ५ वाजता होऊन पदाधिकारी निकाल निवड मोजणीनंतर लगेचच होईल. अशी माहिती तालुका सहकारी निवडणूक अधिकारी तथा सहाय्यक निबंधक सहकारी संस्था श्री एल.टी.डावरे यांनी नांदेड न्यूज लाईव्हशी बोलताना दिली आहे.