जिल्हा शल्य चिकित्सक डॉ.निळकंठ भोसीकर यांनी केलं आवाहन
हिमायतनगर, अनिल मादसवार| नांदेड जिल्ह्यातील हिमायतनगर शहरात दक्षिण आफ्रिकेतून आलेल्या तीन पैकी दोघांचे ओमायक्रॉन अहवाल पॉजिटीव्ह आले आहेत. अशी माहिती जिल्हा शल्य चिकित्सक डॉ निळकंठ भोसीकर यांनी दिली आहे. असेच सर्व जनतेने काळजी घ्यावी आणि कोरोना नियमांचे पालन करून लसीकरण करून घ्यावे असे आवाहन त्यांनी केले आहे.
हिमायतनगर शहरासह नांदेड जिल्ह्यात विदेशातून ३०२ जण दाखल झाले होते. या सर्वांचे आरटीपीसीआर टेस्ट करण्यात आल्यानंतर त्यापैकी हिमायतनगर येथील तिघांचे अहवाल कोरोना पॉजिटीव्ह आल्याने या तीन संशयित रुग्णाचे जीनोम सिक्वेन्सिंग पुण्यातील प्रयोग शाळेत तपासणीसाठी पाठविण्यात आले होते. हा अहवाल येण्यासाठी तब्बल ५ दिवसाचा वेळ लागला, दरम्यान नांदेड जिल्ह्यातील हिमायतनगर शहरातील तीन पैकी त्या दोन कोरोना बाधीत रुग्णाचे सिक्वेन्सिंग अहवाल ओमायक्रॉन बाधीत असल्याचा आज प्राप्त झाला आहे.जिल्हा शल्यचिकित्सक डॉ.निळकंठ भोसीकर यांच्या स्वाक्षरीने हा अहवाल निर्गमित करण्यात आले आहे.
हिमायतनगरच्या पॉझिटिव्ह आलेल्या ३१ वर्षीय महिला व ६ वर्षीय मुलगी या दोन्ही ओमायक्रॉन बाधीत रुग्णावर नांदेडला उपचार सुरु असून, त्यांची प्रकृती ठणठणीत आहे, त्यांच्या संपर्कात आलेल्या ५ जणांचे कोरोना अहवाल नीगेटीव्ह आले असल्याचे वैद्यकीय सूत्रांनी सांगितले आहे. जिल्ह्यात ओमायक्रॉनचा शिरकाव वाढू नये म्हणून प्रत्येकानी लसीकरण करून घ्यावे आणि नियमांचे पालन करणे गरजचे असल्याचे आवाहन प्रशासनाच्या वतीने करण्यात आले आहे.
देशात व राज्यातही ओमिक्रॉनचे रुग्ण आढळल्यामुळे विदेशातून येणाऱ्या प्रत्येक नागरिकांची कोविड तपासणी अनिवार्य करण्यात आली. लसीकरण झालेल्या नागरिकांना ओमिक्रॉनचा संभाव्य धोका कमी आढळल्याचे वैद्यकीय तज्ज्ञांनी वर्तविले आहे. पहिला डोस घेतलेल्या परंतु दुसरा डोस अपूर्ण असलेले व दुसऱ्या डोसची मुदत संपलेल्या व्यक्तींचे तातडीने लसीकरण करून घेऊन ओमिक्रॉन विषाणूचा धोका टाळण्यासाठी प्रशासनाला सहकार्य करावे असे आवाहन करण्यात आले आहे.