अन्य आरोपीनाही लवकरच अटक करून इतर घटनांचा तपास लावणार
चौकशीसाठी न्यायालयाने सुनावली ३ दिवसाची पोलीस कोठडी
हिमायतनगर| मागील महिन्याभरात हिमायतनगर शहरातील भुसारचे दुकान फोडून सोयाबीन लांबविणाऱ्या टोळीने धुमाकूळ माजवून व्यापाऱ्यांची झोप उडविली होती. त्यानंतर पोलिसांना या चोरट्याने जेरबंद करण्याचे मोठे आवाहन उभे होते. या आव्हानाला गांभीर्याने घेऊन पोलीस निरीक्षक भगवान कांबळे व त्यांच्या सहकाऱ्यांनी अवघ्या काही दिवसातच सोयाबीन चोरांच्या टोळीतील दोघांच्या मुसक्या आवळल्या आहेत. यामुळे व्यापारी वर्गातून पोलिसांच्या कामगिरीबद्दल समाधान व्यक्त केले जात आहे. या चोरट्यांनी कसून चौकशी केल्यांनतर शहर व परिसरात झालेल्या अनेक चोरीच्या घटना उघडकीस येण्याची शक्यता वर्तविली जात आहे. दरम्यान दुपारी पोलिसांनी दोन्ही चोरट्याने न्यायालयात हजार केले असता न्यायाधीश महोदयाने पुढील चौकशीसाठी ३ दिवसाची पोलीस कोठडी सुनावली आहे. अशी माहिती पोलीस निरीक्षक भगवान कांबळे यांनी दिली.
हिमायतनगर शहरातील पोलीस स्थानकापासून हाकेच्या अंतरावर असलेल्या सदाशिव मार्केटमधील तीन भुसार दुकानाचे शटर फोडून अज्ञात चोरट्यांनी त्यापैकी गाळा क्रमांक ३ मधून सोयाबीनने भरलेले ७० पोते म्हणजे ३३ क्विंटल सोयाबीन बोलेरो पिकअप जीपमध्ये टाकून चोरून नेले होते. तर गाळा क्रमांक ४ व ५ चे शटर वाकवून नुकसान केले होते. हि घटना दि.२२ च्या मध्यरात्रीला १२.३० ते ६ वाजेच्या दरम्यान घडली असून, चोरून नेलेला सोयाबीनची किंमत १ लक्ष ९० हजार होती. याबाबत व्यापारी संदीप शंकरराव पळशीकर यांनी दिलेल्या फिर्यादीवरून हिमायतनगर पोलिसांनी अज्ञात चोरट्यावर गुन्हा दाखल करून या घटनेचा तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक चौधरी यांच्याकडे देण्यात आला होता.
घटनेची माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी श्वानपथक व ठसे तज्ज्ञांना पाचारण करून अप्पर पोलीस अधीक्षक विजय कबाडे, उपविभागीय पोलीस अधिकारी रांजणगावकर यांच्या मार्गदर्शनाखाली तपास सुरू केला होता. या चोरीच्या तपासासाठी पोलिसांनी एक विशेष पथक पाठवून तसेच शहरातील बाहेरून येणाऱ्या - जाणाऱ्या रस्त्यावरील सीसीटीव्ही फुटेज तपासून विना नंबरच्या पांढऱ्या रंगाची बोलेरो पिकअप वाहन कोणत्या दिशेने गेले याचा शोध घेतला.
दरम्यान मिळालेल्या गुप्त माहितीवरून हिमायतनगर पोलिसांनी हदगाव पोलिसांची मदत घेऊन ल्याहारी ता.हदगाव येथून दोन चोरट्याना काल सायंकाळी म्हणजे दि.२५ डिसेंबर रोजी ताब्यात घेतले. त्यांची चौकशी करत अन्य आरोपीला ताब्यात घेण्यासाठी पोलीस निरीक्षक भगवान कांबळे व त्यांच्या टीमनी प्रयत्न केले. मात्र लोकेशन मिळेपर्यंत काहीजण चोरटे पळून गेले आहेत. तर अटक केलेल्या दोन्ही आरोपीची पोलीस चौकशी करत असून, यांच्या माध्यमातून सोयाबीन चोरीच्या घटनेत सामील असलेल्या अन्य आरोपीना लवकरच अटक केली जाईल दुपारी दोन्ही चोरट्याने न्यायालयात हजार केले असता न्यायाधीश महोदयाने पुढील चौकशीसाठी ३ दिवसाची पोलीस कोठडी सुनावली अशी माहिती पोलीस निरीक्षक भगवान कांबळे यांनी नांदेड न्यूज लाईव्हशी बोलताना दिली.