शारीरिक आरोग्याइतकेच मानसिक आरोग्य महत्त्वाचे – राज्यपाल भगतसिंह कोश्यारी -NNL


मुबई|
केवळ शारीरिक आरोग्य उत्तम असणे पुरेसे नाही. मानसिक आरोग्य तितकेच, किंबहुना अधिक महत्त्वाचे आहे. कोरोना काळात अनेक लोकांना शारिरीक व्याधींसोबतच मानसिक समस्यांचा देखील सामना करावा लागला. कोरोना आला आणि जाईल देखील, परंतु मानसिक आरोग्य जपणे आवश्यक असून डॉक्टरांनी रुग्णांना आत्मविश्वास व नवी उमेद देण्यासाठी विशेषत्वाने प्रयत्न करावे, असे आवाहन राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी आज येथे केले.

जागतिक मानसिक आरोग्य दिनाचे औचित्य साधून आज रविवारी (दि. 10) राज्यपालांच्या हस्ते विविध क्षेत्रातील नामवंत वैद्यकीय तज्‍ज्ञ व डॉक्टरांचा राजभवन येथे सत्कार करण्यात आला, त्यावेळी ते बोलत होते. लोढा फाऊंडेशन व लोढा लग्झरीतर्फे कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.

मानसिक आरोग्याचे महत्त्व सांगताना राज्यपालांनी महाभारत व गीतेचा दाखला दिला. भगवदगीता ही अर्जुन विषादयोगापासून सुरु होते. विषाद म्हणजे डिप्रेशन. भगवान कृष्णांनी अर्जुनाला विषादातून बाहेर काढून युद्ध करण्यास सज्ज होईल इतके समुपदेशन केले असे सांगून डॉक्टरांनी शास्त्रांमधील मानसिक स्वास्थ्याची उदाहरणे देखील तपासावी; त्यातून त्यांना नवनवे दृष्टीकोन मिळतील, असे राज्यपालांनी सांगितले. कार्यक्रमाच्या सुरुवातीला आयरा लोढा या मुलीने मानसिक आरोग्य या विषयावर तयार केलेले ‘व्हाट आर यू वेटिंग फॉर’ हे गीत सादर केले.

राज्यपालांच्या हस्ते मानसोपचार तज्‍ज्ञ डॉ.झिराक मार्कर, डॉ.झरीर उदवाडीया, डॉ.शशांक जोशी, डॉ.मुझफ्फल लकडावाला, डॉ.चेतन भट, डॉ.अब्दुल अन्सारी, डॉ.गौतम भन्साळी, डॉ.पंकज पारेख, डॉ.मनोज मश्रू, डॉ.अंजली छाब्रिया, डॉ.मिलिंद कीर्तने यांसह 40 डॉक्टर्स व तज्‍ज्ञांचा सत्कार या वेळी करण्यात आला. कार्यक्रमाला आमदार मंगल प्रभात लोढा व लोढा रिअलिटीचे मुख्याधिकारी अभिषेक लोढा उपस्थित होते. 

Post a Comment

please do not enter any spam link in the comment box

Previous Post Next Post
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी