भिक्खू संघाच्या धम्मसंदेश व धम्मदान यात्रेच्या चौथ्या पर्वास प्रारंभ -NNL

ग्रामस्थांनी केले खुरगावच्या भिक्खू संघाचे जोरदार स्वागत


नांदेड|
मानवी क्रोध हा उकळत्या पाण्यासारखा असतो. या पाण्यात मानवाचे प्रतिबिंब स्पष्टपणे दिसून येत नाही तसे क्रोधीत मनुष्याचे विचार हळूहळू नष्टप्राय होऊ लागतात. शेवाळलेल्या पाण्यातही आपला चेहरा स्वच्छ दिसणार नाही. त्याचप्रमाणे माणसाच्या मनात शंका कुशंका निर्माण झाल्या तर अशा माणसाला धम्माचा लाभ होत नाही. जर एखाद्या गढूळ झालेल्या पाण्यात एखाद्या व्यक्ती जर आपले प्रतिबिंब पाहू लागला तर त्यालाही त्याचे प्रतिबिंब व्यवस्थित दिसणार नाही. 

त्याचप्रमाणे जर मनात विचारांचा गोंधळ निर्माण झाला असेल तर तथागत गौतम बुद्ध भंते काश्यपाला उपदेश करतांना म्हणतात त्याप्रमाणे जर मनामध्ये विचाराचा गोंधळ निर्माण झाला असेल त्याला त्याला धम्माचा लाभ होऊ शकत नाही, असे प्रतिपादन तालुक्यातील खुरगाव नांदुसा परिसरातील श्रामणेर प्रशिक्षण केंद्राचे संचालक भदंत पंय्याबोधी थेरो यांनी केले. यावेळी अॅड.‌ हरीभाऊ शेळके, यशवंतग्राम कावलगावचे सरपंच नारायणभाऊ पिसाळ, जि.प. सदस्य कोंडिबा सोनटक्के, प्रा. बालाजी खंदारे, कवी विजय सातोरे यांच्यासह खुरगाव येथील भिक्खू संघाची उपस्थिती होती. 

भगवान बुद्ध आणि त्यांचा धम्म' या ग्रंथवाचनाच्या समारोप प्रसंगी तालुक्यातील खुरगाव नांदुसा परिसरातील बौद्ध भिक्षू व श्रामणेर संघाची धम्मसंदेश व धम्मदान यात्रेचे पदार्पण पूर्णा तालुक्यातील धानोरा मोत्याचा येथे झाले. त्यावेळी ग्रामस्थ बौद्ध उपासक उपासिकांकडून भिक्खू संघाचे जोरदार स्वागत झाले. भोजनदानानंतर धम्मदेसनेला प्रारंभ झाला. त्यावेळी धम्मगुरू भदंत पंय्याबोधी बोलत होते. पुढे बोलताना ते म्हणाले की, मनात वैचारिक गोंधळ निर्माण झाला की अज्ञानाचा काळा धूर बाहेर पडतो जो इतरांनाही गोंधळात टाकतो. 

वैचारिक गोंधळामुळे धम्माचा लाभ होत नसेल तर मनुष्याने राग, द्वेष, सुस्ती, संशय, आळस आणि अहंकार यांचा त्याग करून आपले जीवन धम्ममय मार्गाने व्यतीत करावे, असा मनुष्य, धम्मवान व्यक्ती सुखाने झोप घेऊ शकतो. ग्रंथ वाचनाच्या समारोप सोहळ्याच्या सुरुवातीला तक्षशिला बुद्ध विहारात तथागत गौतम बुद्ध आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमांचे मान्यवरांच्या हस्ते दीप व पूष्पपूजन संपन्न झाले. उपासकांच्या याचनेवरुन भिक्खू संघाने उपस्थितांना त्रिसरण पंचशील दिले. भिक्खू संघास फलदान व आर्थिक दान करण्यात आले. आशिर्वाद गाथेनंतर सोहळ्याची सांगता झाली. कार्यक्रमाचे प्रास्ताविक विजय सातोरे यांनी केले. सूत्रसंचालन विश्वनाथ दुधमल यांनी केले तर आभार हौसाजी दुधमल यांनी मानले.  रात्री बुद्ध भीम गितांच्या संगीत रजनीचा कार्यक्रम संपन्न झाला. कार्यक्रमाचे संपूर्ण आयोजन महिला मंडळाने केले होते.

Post a Comment

please do not enter any spam link in the comment box

Previous Post Next Post
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी