नांदेड| बेकायदेशीर कामावरून कमी केलेल्या कामगारांना पूर्ववत कामावर घ्यावे, थकित वेतन अदा करावे या व इतर मागण्यांसाठी हदगाव वनपरिक्षेत्रातील कायम रोजंदारी कामगार काल पासून नांदेड येथील वनविभाग यांच्या कार्यालयासमोर आमरण उपोषणास बसले आहेत. उपोषणाच्या दुसर्या दिवशी शेरसिंग जाधव या कामगाराची प्रकृती बिघडल्याने त्यांना उपचारासाठी शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. कामगारांच्या प्रश्नांकडे वन विभागाचे अक्षम्य दुर्लक्ष होत असल्याने कामगारांमध्ये तीव्र असंतोष पसरला आहे.
हदगाव वनपरिक्षेत्र कार्यालय अंतर्गत वनविभागात कायम रोजंदारी कामगार म्हणून मागील 15-20 वर्षापासून कार्यरत असलेल्या कामगारांना अचानकपणे कुठलेही कारण न देता कामावरून कमी करून नवीन कामगार भरती करण्यात आली आहे. वास्तविक 2004 पूर्वी पासून कायम अथवा तुटक रोजंदारी करणार्या कामगारांना कामावरून कमी करू नये, असे शासनाचे स्पष्ट निर्देश असताना हदगाव वनपरिक्षेत्रात 16 कामगारांना प्रशासनाने अचानक कामावरून कमी केले आहे. या कामगारांना पूर्ववत कामावर रुजू करून घ्यावे तसेच 9 महिन्याचे थकीत वेतन तात्काळ अदा करावे, या मागण्यांसाठी आयटक प्रणित शासकीय औद्योगिक कामगार संघटना गेल्या काही दिवसापासून निवेदने, आंदोलने करुन प्रयत्न करीत आहे. या प्रयत्नांना हदगाव वनपरिक्षेत्र अधिकार्यांनी सकारात्मक प्रतिसाद न दिल्याने संघटनेच्यावतीने बुधवार (दि. 27) पासून नांदेड येथील उपवनसंरक्षक कार्यालयासमोर अमरण उपोषण सुरू केले आहे.
कामगार नेते ऍड.कॉ.प्रदीप नागापूरकर, कॉ.अब्दुल गफार, कॉ. शिवाजी फुलवळे यांच्या नेतृत्वाखाली कॉ.अशोक कांबळे, कॉ. भागोराव सूर्यवंशी, कॉ. विश्वनाथ बोरकर, कॉ. बाबुराव वाळके, कॉ.शेरसिंग जाधव, कॉ. दत्ता लाटकर, कॉ. शिवाजी खिल्लारे, कॉ. बाबू पडघणे, कॉ. रमेश लच्छीराम जाधव, कॉ. बालाजी शेषटेवाड, कॉ.माणिकराव राठोड, कॉ. बाबू राठोड, कॉ.सय्यद हुसेन, कॉ. शिवाजी लाटकर, कॉ.संभा पडघणे, कॉ. कांताबाई पडघणे हे कामगार अमरण उपोषणास बसले आहेत. यातील शेरसिंग जाधव यांची प्रकृती अचानक बिघडल्याने त्यांना शासकीय रुग्णालयात उपचारासाठी हलविण्यात आले आहे.