माळाकोळी, बालाजी नागसाखरे। श्री रेणुका देवी मंदिर पोलीसवाडी पोलेवडी या ठिकाणी 1986 ला श्री रेणुका मातेची स्थापना नरेश नारायणराव देशपांडे मूळ रहिवासी अमरावती हल्ली मुक्काम नागपूर यांच्या संकल्पनेतून देवीची स्थापना झालेली आहे.
नरेश नारायणराव देशपांडे हे सार्वजनिक बांधकाम खात्यात उप अभियंता म्हणून नांदेडला कार्यरत होते. लोहा तालुक्याचा पूर्ण भाग त्यांच्या कार्यक्षेत्रात येत होता माळेगाव कडे रस्त्याची पाहणी करत असताना त्यांना पोलीस वाढीच्या तलावाजवळ साक्षात्कार झाला. रात्री स्वप्नात रेणुका मातेने प्रत्यक्ष श्री देशपांडे यांना माझी स्थापना पुरातन काळापासून जवळपास चारशे वर्षांपूर्वी श्री दत्तात्रयाचे स्थान आहे, त्याच्या बाजूला माझी स्थापना कर असा दृष्टांत झाला, त्यावर देशपांडे साहेबांनी संभाजी गोविंदराव धुळगंडे नावाची व्यक्ती पिसवर्कर म्हणून गुत्तेदारी करत होते ते मुळ रहिवासी पोलेवाडी गावचे त्यांना विचारून त्यांनी मंदिर बांधण्याची कल्पना यांना सांगितली.
त्या जागेची विचारणा केली असता जमीन पोले मंडळीची असल्याचं समजलं. पोले मंडळीच्या सर्वांच्या संमतीने जागा दान देण्यात आली. त्या ठिकाणी रेणुका मातेची स्थापना 1986 या कामांमध्ये देवदत्त मराठे अधीक्षक अभियंता नागपूर, कै.व्यंकटराव मुकदम रा.लोहा, श्रीकृष्ण बगाडे कार्यकारी अभियंता, बाबुराव लक्ष्मणराव शक्करवार नांदेड व त्यांचे सर्व मित्र मंडळी यांच्या सहभागातून हे मंदिराची उभारणी झालेली आहे. श्री रेणुका देवी जागृत देवस्थान असून अनेक भक्तांना पावन होऊन त्यांचे कार्यसिद्ध झालेली आहे. नवसाला पावणारी श्री रेणुकादेवी आहे.
अनेक भक्तांना याचा साक्षात्कार झालेला आहे. नवरात्रात मोठी यात्रा भरते अनेक सांस्कृतिक कार्यक्रम शैक्षणिक कार्यक्रम, रक्तदान शिबिर, कबड्डी, जंगी कुस्त्या, सामाजिक प्रबोधन कार्यक्रम असे अनेक उपक्रम राबविले जातात. या वर्षी आणि मागच्या वर्षी कोरोना महामारी मुळे हे कार्यक्रम रद्द करण्यात आलेले आहेत. या वर्षी कोरोना लसीकरण कॅप चे आयोजन करण्यात आले आहे या सर्व कार्यक्रमात ग्रामपंचायत चे सरपंच पिराजी नागोराव धुळगंडे, ग्रामसेवक एस एस बोळेगावे .उपसरपंच व सर्व ग्रामपंचायत सदस्य आणि ग्रामस्थांचा मोठा सहभाग असतो. दरवर्षी महाप्रसादाचा कार्यक्रम सप्तमीला असतो. या पवित्र कामी नांदेडकर मित्रमंडळ, सर्वग्रामस्थ सहभाग घेऊन कार्यक्रम यशस्वी करतात.
या ठिकाणी पुरातन श्री दत्तात्रय संस्थान चारशे वर्षांपूर्वीचा आहे असा उल्लेख श्रीक्षेत्र माहूर चे महंत यांनी अख्याईकेमध्ये असे सांगितले की, श्री क्षेत्र गाणगापूर वरून माहूरला जाताना दत्तप्रभू या ठिकाणी क्षणभर थांबले आहेत म्हणून या जागेला या ठिकाणाला अत्यंत महत्त्व प्राप्त झालेले आहे. असे सांगण्यात येते की, पौर्णिमेला रात्री बारा वाजता याच ठिकाणी आकाशमार्गे देवाची पालखी निघते आणि या ठिकाणी पालखी थांबते असे सांगण्यात येते.
उंच टेकड्याचा परिसर असल्यामुळे रमणीय ठिकाण असून टेकडीवरून दक्षिण आणि उत्तर याच्यामध्ये सुंदर असा तलाव आहे निसर्गरम्य वातावरण असल्यामुळे अनेक पर्यटक या ठिकाणी मुद्दामहून येतात या तलावात लक्ष्मी कमळाचे फूल निघत होते म्हणून या तलावास कमल तलाव म्हणतात. एकंदरीत हा परिसर असून ग्रामपंचायत कार्यालय पोलीसवाडीच्या वतीने व संस्थांनच्या सहकार्याने 50 केशर आंब्याची व सागाची झाडे लावण्यात आलेली आहेत.